नाशिक : जिल्ह्यात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्षपंढरीवर ‘संक्रांत’ कोसळली आहे. दिंडोरी भागात झालेल्या पावसामुळे नुकसानीचे प्रमाण वाढले असून, पाण्यामुळे मणी तडकल्याने ३० हजार एकरांवरील बागा संकटात सापडल्या आहेत. मण्यांच्या तडकण्याचे प्रमाण कमी होण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी घडांभोवती गुंडाळलेले कागद फाडले. मात्र सायंकाळ झाल्याने कागद फाडण्यास विलंब होण्यातून पावसाचे पाणी आणि आर्द्रतेने अशा घडांमध्ये मणी तडकण्याचे प्रमाण वाढल्याचे शेतकऱ्यांना पाहायला मिळाले.
मणी तडकल्याने ३० हजार एकरांवरील बागा संकटात
अवकाळी पावसामुळे निर्यातक्षम द्राक्षांचे ‘पॅकिंग' गेल्या आठवड्यापासून थांबले आहे. आज पावसाने काहीशी उसंत घेत ढगाळ हवामान निवळून सूर्यनारायणाने दर्शन दिले. तरीही लख्ख सूर्यप्रकाशात सातत्य राहून तडकलेल्या मण्यांची स्थिती स्पष्ट होत नाही आणि घडांचे तडकलेले मणी काढल्यावर व्यापाऱ्यांकडून बागांची पाहणी होत नाही तोपर्यंत निर्यातक्षम द्राक्षांचे ‘पॅकिंग’ लांबणीवर पडणार आहे. विशेषतः साखर उतरल्याने काढणीला आलेल्या आणि आठवडाभराने काढणी करावयाच्या अशा बागांमध्ये मणी तडकण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यात १ ते २० सप्टेंबर या कालावधीत छाटलेल्या बागांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. थॉमसन, सोनाकासह रंगीत वाणांना अवकाळीने दणका दिला आहे. त्यामुळे एकीकडे शेतकऱ्यांचे नुकसान होत असतानाच यंदा निर्यातीच्या द्राक्षांचे प्रमाण राहण्याची चिन्हे दिसताहेत.
हेही वाचा > रुग्णवाहिकाचालकाने अॅम्ब्युलन्समध्येच साधली संधी; अपघातग्रस्त रुग्णासोबतच धक्कादायक प्रकार
तडकलेले मणी काढण्याची नाही सोय
पावसाच्या पाण्यासोबत आर्द्रतेने तडकलेले मणी काढून उरलेला घड स्थानिक बाजारपेठेत अथवा बेदाण्यासाठी विकण्याची सोय राहिलेली नाही. इतक्या नुकसानीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले आहे. आता ऊन पडायला लागले असून, ऊन पडण्यातून तडकणाऱ्या मण्यांचे प्रमाण वाढण्याची भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. अवकाळीच्या जोडीला आर्द्रता ९० टक्क्यांपर्यंत राहिलेली असताना किमान तापमान पाच अंश सेल्सिअसच्या खाली न घसरल्याने थंडीचे प्रमाण कमी राहिल्याने द्राक्षांच्या नुकसानीचे प्रमाण आणखी वाढू शकलेले नाही.
हेही वाचा > चोरट्यासोबत जेव्हा 'ती' महिलाही चालत्या रेल्वेतून पडली खाली; घटनेने प्रवाशांचा थरकाप
घडांचे फाडले कागद; निर्यातीसाठी ‘पॅकिंग’ सततच्या सूर्यप्रकाशापर्यंत लांबणीवर
पावसाच्या तडाख्यात नुकसान झालेली द्राक्षे शेतकरी वायनरीला देत असत. मात्र कोरोना महामारीत मागील हंगामातील वाइन न खपल्याने करार केलेल्या शेतकऱ्यांचे द्राक्षे घेणे सद्यःस्थितीत वायनरीज कशा घेतील, असा प्रश्न तयार झाला आहे. तडकलेले मणी काढून उरलेली द्राक्षे पंधरा रुपये किलो भावाने देण्यासाठी शेतकऱ्यांनी वायनरीजशी संपर्क साधला होता. मात्र त्यास प्रतिसाद मिळालेला नाही. -कैलास भोसले, द्राक्ष उत्पादक