द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा आग्राच्या व्यापाऱ्यास चोप; सहा वर्षांत ७० लाखांचा गंडा  

नांदूरमध्यमेश्‍वर (जि.नाशिक) : निफाड, चांदवड व दिंडोरी तालुक्यातील अनेक द्राक्ष उत्पादकांकडून लाखो रुपयांची द्राक्षे खरेदी करून त्यांना गंडा घालणारा आग्रा येथील व्यापारी अजयपाल चव्हाण याला येथील फसवणूक झालेल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी पकडून चांगलाच चोप दिला व त्यानंतर निफाड पोलिसांच्या स्वाधीन केले. 

द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा आग्रा येथील व्यापाऱ्यास चोप 
चव्हाण याने २०१४ मध्ये चांदवड तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे २० लाख, २०१७ मध्ये नांदूरमध्यमेश्‍वर (ता. निफाड) येथील शेतकऱ्यांचे २५ लाख, २०१८ मध्ये मोहाडी (ता. दिंडोरी) येथील शेतकऱ्यांचे दहा लाख, २०१९ मध्ये कोकणगाव (ता. निफाड)च्या शेतकऱ्यांचे १५ लाख याप्रमाणे एकूण ७० लाख रुपयांची द्राक्षे खरेदी करुरून पलायन केले होते. त्यानंतर एक वर्षभर तो या परिसरात फिरकलाच नाही. यंदाच्या हंगामात मात्र लासलगाव, विंचूर, नांदुर्डी येथील शेतकऱ्यांची द्राक्षे घेऊन त्याचा खुडा सुरू होता.

सहा वर्षांत ७० लाखांचा गंडा 

गेल्या आठवड्यात शेतकऱ्यांना याची कुणकुण लागली होती. शनिवारी (ता. १३) सायंकाळच्या सुमारास शेतकऱ्यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना सांगून, त्याच्या मोबाईलचे लोकेशन चेक केले. त्या वेळी तो दुचाकीद्वारे नांदुर्डीकडे खुडा सुरू असलेल्या मळ्यात येत असल्याचे समजले. नांदूरमध्यमेश्‍वर येथील फसवणूक झालेले संदीप शिंदे, गोरख कांदळकर, सागर शिंदे, साहेबराव धुमाळ या शेतकऱ्यांना ही माहिती कळताच ते नांदुर्डी रस्त्यावर लोणवाडी थांब्याजवळ थांबले.

हेही वाचा - नाशिकमधील धक्कादायक घटना! कुटुंबाचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; पोलीस तपास सुरू

निफाड पोलिसांच्या ताब्यात

काही वेळातच हा व्यापारी लोणवाडीला आला. त्या वेळी त्याला थांबण्यास सांगितले. मात्र, परिस्थिती लक्षात येताच त्याने दुचाकी पुन्हा पिंपळगाव बसवंतच्या दिशेने वेगाने नेली. त्यावर या शेतकऱ्यांनी पाठलाग करून त्याला पिंपळगाव बसवंत टोलनाक्याजवळ पकडून चोप दिला. त्यानंतर त्याला निफाड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

हेही वाचा - दुर्दैवी अपघात आणि महापालिका कर्मचाऱ्याचे अख्खे कुटुंब उध्वस्त; ५ वर्षीय चिमुरडा ठार, पत्नी गंभीर