द्राक्ष विकली ५ रुपये किलोने, रद्दी घ्यावी लागतेय ४० रुपये किलोने; द्राक्ष उत्पादकांची व्यथा

लखमापूर (नाशिक) : मागील द्राक्ष हंगामाला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला असला तरी त्याच्या झळा आजही सुरूच असून, त्याच्या संकटातून मार्ग काढताना शेतकरी मात्र मेटाकुटीस आला आहे. कोरोनामुळे द्राक्षबागेला ना देशात बाजार मिळाला ना प्रदेशात, या मुळे उत्पादकांनी अवघ्या पाच, दहा, ते १५ रुपये किलो दराने द्राक्ष विकली. तर काहींनी दोन-तीन रुपये किलो दराने द्राक्ष विकल्याचा कटू अनुभव पाठीशी असताना पुन्हा नव्या उमेदीने हंगाम सुरू केला. 

उत्पादन खर्चात भरमसाठ वाढ

द्राक्ष उत्पादकांकडून या हंगामात जोरदार तयारी सुरू आहे. मात्र कीटकनाशक आणि खतांच्या किमती गगनाला भिडल्या. उत्पादक आर्थिक अडचणीत आहे. मजुरीचा विचार केला तर मागील वर्षाच्या तुलनेत मजुरांनी दुप्पटीने वाढ केल्याची परिस्थिती आहे. द्राक्ष घडांच्या थिनिंगसाठी मजूर १४ ते १५ हजार रुपये एकरी मजुरी घेत आहेत. डिपिंगसाठी (घड औषधात बुडविणे) चार ते साडेचार हजार रुपये एकरी, अतिरिक्त मणी काढण्यासाठी सात ते आठ हजार रुपये एकरी आणि ऑक्टोबर छाटणीचा दरही एकरी पाच हजार रुपये आकारण्यात आला. 

हेही वाचा > नियतीची खेळी! लेकाला जेवण घेऊन माऊली आली शेतात; आणि घरी घडले भलतेच

रद्दी बंडल यंदा थेट ४०० वर

डिझेल, रासायनिक खते, विद्राव्य खते, मागील वर्षाच्या उत्पादनात सत्तर टाक्क्याची घट अशी न मांडता येणारी संकटांच्या काळात आता द्राक्ष घडांवर उन्हाचा परिणाम होऊ नये म्हणून रद्दी पेपरचा वापर घड झाकण्यासाठी करतात. दर वर्षी १५० ते २०० रुपयांना मिळणारा दहा किलो रद्दी बंडल यंदा थेट ४०० रुपयांपर्यंत पोचला आहे. रद्दीच्या भावात झालेली भरमसाट वाढ शेतकऱ्यांना तापदायक ठरत आहे. 

‘नाका पेक्षा मोती जड’

द्राक्षाच्या एका एकरासाठी किमान ३५ ते ५० रद्दी बंडल लागतात. त्याचबरोबर त्यासाठी लागणाऱ्या अन्य वस्तूंमध्येही वाढ पाहता शेतकऱ्यांना द्राक्षाला कागद लावणे म्हणजे ‘नाका पेक्षा मोती जड’ असा झाला आहे. ज्या शेतकऱ्यांनी पाच ते दहा रुपये किलो दराने द्राक्ष विकली त्यांना चाळीस रुपये किलोचा कागद द्राक्षाला लावताना शंभर वेळा विचार करावा लागणार आहे. अशा परिस्थितीतही शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने हंगाम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. परंतु द्राक्षबागांसाठी लागणाऱ्या सर्वच घटकांमध्ये होत असलेली वाढ शेतकऱ्यांसाठी तापदायक ठरत आहे. 

हेही वाचा > क्रूर नियती! तो' एक सेल्फीचा मोह अनावर; अन् माऊली लेकरांपासून दुरावली कायमची

कोरोनाच्या काळात अनेक महिने वर्तमानपत्रांची छपाई न झाल्याने बाजारात पेपरची रद्दीचा पुरवठा होत नाही. अचानक मागणी वाढल्याने दिवसागणित रद्दी बंडलसाठी दररोज एक ते दोन रुपये किलो मागे वाढत असल्याने तोंडचे पाणी पाळले आहे. मात्र निर्यातीसाठी पेपर लावणे गरजेचे असल्याने शेतकऱ्यांच्या पुढे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी स्थिती झाली आहे. 
- श्रीहरी घुमरे, द्राक्षतज्ज्ञ, जानोरी