द्राक्ष हंगामाचा शेवट होणार गोड! निर्यातीसह स्थानिक मालाच्या भावात वाढ 

पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) : द्राक्ष हंगाम अंतिम चरणात पोचला असताना दराला चांगलाच गोडवा आला आहे. स्थानिकसह निर्यातक्षम द्राक्षांच्या दरात प्रतिकिलो दहा रुपयांची वाढ झाली आहे. देशांतर्गत द्राक्षाला सरासरी ३५ रुपये, तर निर्यातक्षम द्राक्षाला ५५ रुपये असा दर मिळू लागल्याने हंगामाचा शेवट द्राक्षाप्रमाणे गोड होईल, असे सुखद चित्र आहे. गेल्या वर्षीची सरासरी ओलांडत आतापर्यंत तब्बल साडेसात हजार कंटेनरमधून सुमारे एक लाख टन द्राक्ष सातासमुद्रापार पोचले आहे. 

निर्यातीसह स्थानिक मालाला प्रतिकिलो दहा रुपयांची वाढ 
यंदा दराअभावी द्राक्ष हंगामाचा श्रीगणेशा काहीसा निराशाजनक झाला. त्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने द्राक्ष उत्पादकांच्या जखमेवर मीठ चोळले गेले. अवघ्या २५ ते २८ रुपये प्रतिकिलो दराने द्राक्षांचे सौदे होत होते. परिपक्व होऊन चार महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झाल्याने मिळेल त्या भावात शेतकऱ्यांनी बागा खाली करून घेतल्या. परिणामी, उत्पादनखर्चही मिळाला नाही. 

दरात तेजी 
हंगामाच्या अखेरीस म्हणजे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून द्राक्षदरात तेजी येईल, असा अंदाज वर्तविला जात होता. तो खरा ठरतो आहे. थामसन, सोनाका, सुधाकर या वाणांच्या द्राक्षदरात दहा रुपये प्रतिकिलो मागे तेजी आली आहे. दर ३५ ते ४० रुपयांपर्यंत झेपावले आहेत. हंगाम अजून २० टक्के शिल्लक आहे. सध्या नाशिक जिल्ह्यातून २५० ते २८० ट्रकमधून पाच हजार टन द्राक्ष दररोज उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब, उत्तरांचल या राज्यांत पोचत आहे. दरवाढीमुळे दररोज पाच कोटी रुपये शेतकऱ्यांना अधिकचे मिळू लागले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये सुरू होणारा नवरात्रोत्सव, रमजान यांसह लग्नसराईमुळे द्राक्षांचे दर वधारले आहेत. शिवाय दरवाढीची शक्यता गृहीत धरून स्थानिक बाजारपेठेसाठी व्यापारी शीतगृहात साठा करत आहे. परिणामी, द्राक्ष दरात गोडवा आला आहे. अजून दरवाढीच्या अपेक्षेने शेतकरी सौदे रद्द करू लागल्याने व्यापारी व शेतकऱ्यांमध्ये कुरबुरी होऊ लागल्या आहेत. 

एक लाख टन द्राक्ष सातासमुद्रापार 
चिली, दक्षिण आफ्रिका या देशांशी स्पर्धा करत भारतीय द्राक्षांनी युरोप, रशियासह जगभरातील बाजारपेठेत हुकूमत गाजवली आहे. नेदरलँड, यूके, जर्मनी आदींसह भारतातून आजपर्यंत साडेसात हजार कंटेनरमधून एक लाख टन द्राक्ष सातासमुद्रापार पोचले आहेत. गेल्या वर्षापेक्षा निर्यात सातशे कंटनेरने अधिक असून, आठ हजार टन द्राक्ष अधिक निर्यात झाले आहेत. इजिप्तचा हंगाम सुरू होण्यास पंधरा दिवस उशीर असल्याने भारतीय द्राक्षांना मागणी वाढली आहे. त्यातच नाशिकमधील द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने पुरवठ्यापेक्षा मागणी वाढली आहे. त्या मुळे निर्यातक्षम द्राक्षांचे दर ५५ ते ६० रुपये किलोपर्यंत पोचले आहेत. 

ठराविक शेतकऱ्यांना लाभ 
वेळेत छाटणी करून लवकर द्राक्ष बाजारात आली, की अधिक दर मिळायचा, असे आतापर्यंतचे समीकरण होते. यंदा मात्र हंगामाच्या शेवटी उच्चांकी दर मिळत आहे. अधिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांचे काही प्लॉट शिल्लक आहेत. त्यांनाच या दरवाढीचा लाभ होत आहे. 

 

निर्यातक्षम द्राक्षबागा कमी प्रमाणात शिल्लक आहेत. शिवाय सुएझ कालव्याचा प्रश्‍न मार्गी लागला. मागणी वाढल्याने दरात तेजी आली आहे. विशेष म्हणजे, यंदा एक लाख टनापर्यंत विक्रमी निर्यात झाली आहे. भारतीय द्राक्षांसाठी ही सकारात्मक बाजू आहे. 
-लक्ष्मण सावळकर, मॅग्नस ग्रेप्स एक्स्पोर्ट 

 

परराज्यात नवरात्रोत्सव, सण-उत्सव, लग्सराई सुरू होत आहे. त्या मुळे फळांना मागणी वाढून दरात तेजी आहे. हंगामाच्या शेवटी अजून दर वाढू शकतात. 
-राजेश यादव, देवेंद्र सोनी, द्राक्ष व्यापारी, पिंपळगाव बसवंत