द्राक्ष हंगामाचा श्रीगणेशा! दरात गोडवा येण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा 

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : खवय्यांच्या जिभेवर अवीट गोडी पेरण्यासाठी निफाड, दिंडोरी, चांदवड तालुक्यातील मधाळ द्राक्ष हंगामाचा पडदा बाजूला सरकला आहे. अवकाळी पाऊस स्थानिक द्राक्षांना दणका दिला तर पराज्यात थंडी, धुके यामुळे यंदा १५ दिवस उशिराने द्राक्ष हंगामाला सुरवात झाली आहे. सरासरी ३५ रुपये किलोने द्राक्षांचे सौदे होत असून, दरातही अद्याप गोडवा आलेला नाही. १० फेब्रुवारीनंतर द्राक्ष हंगाम जोरात सुरू होणार आहे. 

मकरसंक्रांतीनंतर पिंपळगाव परिसरातील द्राक्ष हंगामाला गोडवा येतो. यंदा, मात्र प्रतिकूल हवामानाने द्राक्ष उत्पादकांची कसोटी पाहिली. थंडी व नंतर अवकाळी पावसाने द्राक्ष हंगामाची रया जाते की काय, अशी स्थिती होती. या आव्हानात्मक परिस्थितीला तोंड देत शेतकऱ्यांनी दर्जेदार द्राक्ष पिकविली. द्राक्षावर भुरी, घडकूज, डाउनी या रोगांशी झुंज देत शेतकऱ्यांनी निर्यातक्षम द्राक्षे पिकविली आहेत. यासाठी दिवसाला दोन-दोन औषध फवारण्या केल्या. सध्या ऑगस्ट व ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात छाटणी झालेल्या बागांमध्ये द्राक्षमण्यांत साखर उतरून परिपक्व झाली आहेत. मधाळ द्राक्षे लगडली आहेत. द्राक्ष खरेदीसाठी परप्रांतीय व्यापारी दाखल होत आहेत. 

दररोज दोन हजार टन द्राक्षे परराज्यात 

पिंपळगाव बसवंत येथून ५० ट्रकमधून दिल्ली, कानपूर, जयपूर, लखनऊ, गोरखपूर, पश्‍चि‍म बंगाल, सिलीगुडी आदींसह देशभरात द्राक्षे पोचत आहेत. यासह उगाव, वडनेरभैरव, मोहाडी, खेडगावमधून ५० ट्रक रवाना होत आहेत. दररोज सुमारे दोन हजार टन द्राक्षे नाशिक जिल्ह्यातून परराज्यात पोचत आहेत. थॉमसन व सफेद वाणाच्या द्राक्षाला सरासरी ३५, तर रंगीत द्राक्षांचे ४० ते ६० रुपये प्रतिकिलोने सौदे होत आहेत. परराज्यातील मुख्य बाजारपेठा असलेल्या शहरांमध्ये थंडी व धुक्याचा कहर सुरू आहे. त्यामुळे द्राक्षांची मागणी अद्याप वाढलेली नाही. थंडी जाऊन तापमान वाढताच द्राक्ष दर वधारतील. हंगामाचा श्रीगणेशा झाल्याने द्राक्षनगरी मात्र गजबजू लागली आहे. 

हेही वाचा > अखेर गूढ उकललेच! म्हणून केली रिक्षाचालकाने 'त्या' गर्भवती महिलेची हत्या

व्यापाऱ्यांची प्रतीक्षा 

जिल्ह्यात अद्याप द्राक्ष हंगामाने गती घेतलेली नाही. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हंगाम भरात येईल. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना परप्रांतीय व्यापाऱ्यांची प्रतीक्षा आहे. दर वर्षी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होणारा हंगाम प्रतिकूल वातावरणामुळे लांबला. पावसाचे विघ्न दूर झाल्यानंतर एकाच वेळी द्राक्षबागांची छाटणी झाली. त्यामुळे एकाच वेळी बंपर पीक काढणीला येऊ शकते. 

हेही वाचा > वाढदिवशीच दोघा मित्रांवर काळाची झडप; 'तो' प्रवास ठरला अखेरचाच

गेल्या वर्षी कोरोनामुळे लॉकडाउन झाले. परिणामी, शेतकऱ्यांना मातीमोल दरात द्राक्षे विकावी लागली. यंदाचे वर्षही शेतकऱ्यांची कसोटी पाहणारे ठरले. अवकाळी पावसाने औषध फवारणीचा खर्च दुपटीने वाढला. पन्नास रुपये किलोच्या पुढे स्थानिक बाजारपेठेत द्राक्षे विकली गेली, तर दोन पैसे शेतकऱ्यांना मिळू शकतील. 
-माधवराव ढोमसे, द्राक्ष उत्पादक 

अजून परराज्यात थंडी असल्याने द्राक्षाला मागणी नाही. आतापर्यंत पाठविलेल्या द्राक्षांतून व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. तापमान वाढताच द्राक्षाला मागणी वाढून दरही वधारतील. 
-इर्शाद अली, द्राक्ष व्यापारी