द बर्निंग कारचा थरार! धावत्या कारने घेतला अचानक पेट; मुंबई-नाशिक महामार्गावरील घटना

इगतपुरी (जि.नाशिक) : अचानक धूर निघत असल्याचे कार चालकाच्या लक्षात आल्याने त्याने गाडी रस्त्याच्या कडेला गाडी लावली. यानंतर काही वेळेतच कारने अचानक पेट घेतला. हा बर्निंग कारचा थरार मुंबई-नाशिक महामार्गावरील तळेगाव शिवारात सायंकाळी ६ च्या सुमारास घडला. घटनेने महामार्गावरील दुतर्फा वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. 

वाहनचालकांचे काय?

ही घटना पोलिसांना समजताच पथक घटनास्थळी आले. महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीच्या अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण केल्याने आग आटोक्यात आणण्यात यश आले, मात्र तोपर्यंत गाडी खाक झाली होती. वाहनचालक सय्यद अब्दुल सलाम व सहकारी अकीब शेख (रा. कल्याण) या दोघांनी सतर्कता बाळगल्याने दोघांचे प्राण वाचले. घटने दरम्यान मुंबईहून नाशिककडे जाणारी वाहतूक काही वेळेसाठी ठप्प झाली. महामार्ग पोलिसांनी काही वेळेतच वाहतूक सुरळीत केल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले.

हेही वाचा - झटपट श्रीमंतीच्या मोहात तरुणाई गुन्हेगारीकडे! द्राक्षनगरीत फोफावतेय भाईगीरीचे वेड

घटनास्थळी मदतकार्य

मुंबई-नाशिक महामार्गावरील तळेगाव शिवारात स्कॉर्पिओ कारला बुधवारी (ता.१०) सांयकाळी अचानक आग लागल्याने या घटनेत वाहन जळून खाक झाली. अपघातात सुदैवाने वाहन चालकासह एक जण सुरक्षित बचावला. घटनेने महामार्गावरील दुतर्फा वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. या वेळी महामार्गाचे सहाय्यक निरीक्षक अमोल वालझाडे यांच्या मार्गदर्शनाखाली माधव पवार, सुनील खताळ, जितेंद्र विणकर, राहुल सहाणे, केतन कापसे, जयहरी गांगुर्डे यांनी घटनास्थळी मदतकार्य सुरू केले व महिंद्रा कंपनी अग्निशमन दलाचे सुरक्षा अधिकारी प्रतीक पांडे, अजय म्हसने, महेंद्र भटाटे, प्रदीप राजपूत ,केदार औधकार, अनिल शिंदे, नगरपालिका अग्निशमन दलाचे नागेश जाधव, कृष्णा गायकवाड आदींनी आग आटोक्यात आणण्यासाठी परिश्रम घेतले. 

हेही वाचा - एक विलक्षण प्रेम! बाभळीच्या झाडात अडकलेल्या साथीदारासाठी लांडोराची घालमेल; पाहा VIDEO

 

 

.