धक्कादायक! चाचणीविनाच परराज्यातील प्रवासी दाखल; कोरोना दुसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

नाशिक : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर परराज्यातील प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. विमानाने येणाऱ्या प्रवाशांची काळजी घेतली जात असली, तरी आठवड्यात आठशेच्या आसपास प्रवासी रेल्वेने आले आहेत.

विमानतळावर तपासणी;  रेल्वेस्थानक मात्र'राम भरोसे’ 

नाशि कशिवाय इगतपुरी, मनमाड स्थानकाचा विचार करता ही संख्या दीड हजाराच्या आसपास आहे. मात्र सध्या कुठल्याच प्रवाशांची कोरोना चाचणी होत नाही. कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या भरवशावरच प्रवाशांची सुरक्षाव्यवस्था सुरू आहे. परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करून त्यांना सोडण्याबाबत कुठलेही नियम नसल्याने आठवडाभरात आठशेच्या आसपास प्रवासी परराज्यातील गाड्यांतून नाशिकला आले. मंगळवारी पुन्हा गोवा एक्स्प्रेसने मनमाडला १७, तर हरिद्वार एक्स्प्रेसने १७३ जण नाशिक रोडला आले. तत्पूर्वी आठवडाभर साडेसातशेहून अधिक प्रवासी नाशिक रोडला रेल्वेने आले. मात्र त्यांची काहीच तपासणी झाली नाही. लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर अनलॉक प्रक्रियेत रेल्वे स्थानकावरील तपासणी यंत्रणा शिथिल झाली. महिन्यापासून, तर कंत्राटी सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या भरवशावरच प्रवाशांच्या सुरक्षेचे कामकाज सुरू होते. 

हेही वाचा>> निशब्द! अकरा दिवसांच्या बाळाला उराशी धरून सैनिकपत्नीने फोडला हंबरडा; आक्रोश आणि हळहळ

आठवड्यातून दोन गाड्या 
दिल्लीहून आठवड्यातून दोन गाड्या नाशिकला येतात. तर मंगला एक्स्प्रेसने रोज प्रवासी प्रवास करतात. मंगला एक्स्प्रेसने रोज दीडशे ते पावणेदोनशे प्रवासी नाशिकला दिल्लीहून उतरतात. परराज्यातील रेल्वेतून येणाऱ्या या प्रवाशांची कोरोना चाचणी करणे शासनाने बंधनकारक केलेले असताना नाशिक रोड येथील रेल्वेस्थानकावर महापालिकेने काहीच उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांना तपासणीविनाच शहरात सोडले जाते. याशिवाय इगतपुरी, मनमाड स्थानकावर प्रवासी प्रवास करतात. 

हेही वाचा>> मध्यरात्रीचा थरार! पेट्रोलपंपावरून पाच लाख लांबविले; घटना cctv मध्ये कैद

विमानतळावर खबरदारी 
दरम्यान, नाशिकला दोन विमानाच्या फेऱ्या होतात. साधारण पंधरा ते सतरा प्रवासी या सरासरीने लोक त्यातून नाशिकला येतात. मात्र ओझर विमानतळ लष्करी प्रशासनाच्या अखत्यारीत असल्याने विमानप्रवास करणाऱ्या प्रवाशांची तपासणी होत असल्याचे सांगण्यात आले.