धक्कादायक! पाणीपट्टीतून अवघी ३४ कोटींची वसुली; सर्वसामान्यांची जोडणी मात्र तोडण्यात धन्यता 

नाशिक : महापालिकेच्या घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीत मोठी तूट दिसून येत असून, पाणीपट्टीच्या एकूण दीडशे कोटी रुपयांपैकी अवघे ३३.९५ कोटी रुपये वसूल झाल्याची बाब समोर आली आहे. देयकांचे वाटप करून वसुली करण्याच्या सूचना आयुक्त कैलास जाधव यांनी विभागीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 

एलबीटी, विविध कर, बांधकाम शुल्कासोबतच महापालिकेला घरपट्टी व पाणीपट्टीतून महसूल प्राप्त होतो. पाणीपुरवठा करताना ‘ना नफा- ना तोटा’ या तत्त्वाचा अवलंब केला जातो. याचा अर्थ सर्वच सेवा मोफत द्यायची नसते. परंतु, पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून वेगळा अर्थ घेतला जातो की काय, अशी शंका घेण्यास वाव आहे. थकबाकीसह दीडशे कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट २०२०-२१ या आर्थिक वर्षात देण्यात आले होते. त्यापैकी अवघे ३४.९५ कोटी रुपये वसूल झाले आहेत. पाणीपट्टीच्या एक लाख ९१ हजार ३६७ घरगुती नळजोडण्या आहेत. व्यावसायिक तीन हजार ८७६, अव्यावसायिक तीन हजार ८६४ अशा एकूण एक लाख ९९ हजार १०७ नळजोडण्या आहेत. थकबाकीपैकी १४ टक्के, तर चालू वसुलीपैकी ३१ टक्के वसुली झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 

हेही  वाचा - थरारक! सिटबेल्टमुळे पेटलेल्या गाडीत अडकला चालक; नातेवाईकांना घातपाताचा संशय 

असे आहेत थकबाकीदार 

पाच हजार ते दहा हजार रुपये थकबाकी असलेले ३४ हजार ७७७ थकबाकीदार असून, त्यांच्याकडून २४ कोटी ३७ लाख ६१ हजार रुपये थकले आहेत. दहा ते पंधरा हजार रुपये थकबाकी असलेले १५ हजार १३४ ग्राहक आहे. त्यांच्याकडे १८ कोटी ५१ लाख १९ हजार रुपये थकले आहेत. पंधरा ते २५ हजार रुपये थकबाकी असलेले ११ हजार ५१४ ग्राहक असून, त्यांच्याकडे २१ कोटी २४ लाख १२ हजार रुपये थकले आहेत. २५ हजारांपेक्षा अधिक थकबाकी असलेले चार हजार १२५ थकबाकीदार असून, त्यांच्याकडे २९ कोटी आठ लाख रुपये थकले आहेत.  

 हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ