धक्कादायक! स्मार्टसिटी ठेकेदाराकडून उघडपणे वीजचोरी; वीज वितरण कंपनीतर्फे पंचनामा

म्हसरूळ (नाशिक ) : शहरात स्मार्टसिटीअंतर्गत काम सुरू असून, या कामाचा महत्त्वाचा टप्पा पंचवटी गावठाण भागात सुरू आहे. सरदार चौक ते रामकुंडदरम्यान गटारीचे काम सुरू आहे.

या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात रोज साचलेले पाणी वीजपंपाच्या सहाय्याने काढले जात असून, स्मार्टसिटीअंतर्गत काम करणाऱ्या ठेकेदाराने थेट वीज वितरण कंपनीच्या डीपीतून विनापरवाना वीजजोडणी करून उघडपणे वीजचोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. घटनास्थळाहून सुमारे २० मीटर टू कोर वायर्स जप्त करण्यात आली आहे. 

हेही वाचा > ऐनसंक्रांतीच्या सणाला घरावर ओढावली 'संक्रांत'; लेकाला उराशी धरुन मातेचा जीवघेणा आक्रोश

वीजचोरीचे बिल दिले जाणार

अनेक दिवसांपासून हा ठेकेदार उघड वीजचोरी करीत असल्याने वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तत्काळ पंचनामा केला. संबंधित ठेकेदाराला वीजचोरीचे बिल दिले जाणार असून, त्याने बिलाची रक्कम भरण्यासाठी टाळाटाळ केली, तर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे वीज कंपनीमार्फत सांगण्यात आले. गोदाघाट परिसरात स्मार्टसिटीअंतर्गत अनेक दिवसांपासून काम सुरू आहे. कामासाठी खड्डे खोदले आहेत. खोदकाम केल्यानंतर त्या खड्ड्यात जमिनीतून निघणारे पाणी साचते. ठेकेदार रोज वीजपंप लावून खड्ड्यात साचलेले पाणी बाहेर काढतो. मात्र, पाणी वीजपंपाच्या सहाय्याने काढण्यासाठी वीज मीटर घेणे बंधनकारक असताना, ठेकेदाराने शक्कल लढवून वीज मीटर न घेता थेट डीपीत वायर जोडून वीजचोरी केली. हा प्रकार काही नागरिकांनी पंचवटी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना कळविला. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी करून पंचनामा केला.  

हेही वाचा > ढोंगीबाबाचा कारनामा! आधी खड्याचा केला रुद्राक्ष अन् नंतर केले असे काही; रवानगी थेट पोलिस ठाण्यातच