धनादेश काढून देण्याच्या मोबदल्यात ५० हजारांची मागणी; बाभूळगावच्या ग्रामसेवकास लाच घेताना अटक​

येवला (जि.नाशिक) :  पूर्णत्वास नेलेल्या कामाच्या रकमेचा धनादेश काढून देण्याच्या मोबदल्यात 50 हजार रूपयांची लाच स्वीकारताना बाभूळगाव येथील ग्रामसेवकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याची घटना शुक्रवारी घडली.

एकूण बिलाच्या दहा टक्के रकमेची मागणी
नाशिक स्थित साईराम इलेक्ट्रिक वर्क्स या फर्मच्या वतीने बाभूळगाव (ता. येवला) येथे बारा मीटर उंचीचे इलेक्ट्रिक हायमास्ट खांब बसवण्याचे काम पूर्ण करण्यात आले. त्या कामाचे उर्वरित 1.58 लाखांच्या रकमेचा धनादेश काढून देण्याच्या मोबदल्यात एकूण बिलाच्या दहा टक्के रकमेची मागणी तक्रारदाराकडे ग्रामसेवक रावसाहेब वानखेडे यांनी केली. त्यासंदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता सापळा रचण्यात येऊन वानखेडे यांनी ही रक्कम स्वीकारण्याचा प्रयत्न केल्याचे पंचासमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले.

येवला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लाच मागितल्याच्या कारणावरून त्यांच्या विरोधात येवला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यापुढे लाचेचे असे प्रकार घडत असतील तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.