धान्य व्यापाऱ्यांचे गाळे जप्त करणार; बाजार समिती आक्रमक 

म्हसरूळ (जि.नाशिक) : बाजार समितीच्या नियमानुसार धान्य व्यापाऱ्यांनी गाळ्यांमध्ये व्यवसाय करणे बंधनकारक असतानाही ७० टक्के गाळे बंदच आहेत. अनेकांनी या गाळ्यांमध्ये गुदामे थाटली असून, अशा व्यापाऱ्यांचे गाळे जप्त केले जाणार आहेत, असा इशारा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे यांनी दिला आहे. 

गुदामाविरोधात बाजार समिती आक्रमक 

बाजार समिती उपविधी कलम १६/४ नुसार व पणन मंडळाच्या निर्णयानुसार अनियंत्रित धान्य मालावर सेवाशुल्क वसूल केले जाते. तेदेखील व्यापारी देत नाहीत. तत्कालीन सभापतींनी सेवाशुल्क वसूल न केल्यामुळे मागील लेखापरीक्षण अहवालात संचालक मंडळावर ठपका ठेवण्यात आला आहे. सेवाशुल्क वसुलीपोटी धान्य व्यापारी वर्गास बाजार समितीकडून रस्ते, पाणी, वीज, सुरक्षा अशा मूलभूत गरजा पुरविल्या जातात. सेस वसुलीवरून प्रत्येक वेळी धान्य व्यापारीवर्गाने शासनाची दिशाभूल केली आहे. या व्यापाऱ्यांमुळे बाजार समितीचे आर्थिक नुकसान झाले असून, बँकेला मोठी रक्कम चुकवावी लागली आहे. धान्य व्यापाऱ्यांना मार्केट फी अत्यंत नगण्य असून, तीदेखील त्यांच्याकडून मिळत नसल्याने बाजार समितीला सुमारे शंभर ते सव्वाशे कोटींचा फटका बसला आहे. 

हेही वाचा - जन्मतः अंध घुबडाची श्रुती बनली "आई-बाबा"! कोरोना काळातील एक अनोखी कथा अन् प्रेमही​

प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांनाच गाळे
महाराष्ट्र खरेदी-विक्री (विकास विनियमन) अधिनियम १९६३ चे कलम ८ व गाळेधारकाच्या करारनाम्यातील अटी व शर्तीनुसार सहा महिन्यांच्या आत ज्या व्यापाऱ्यांकडून बाजार समिती आवारात कुठलाही व्यवहार न होता गाळे पडून ठेवले जात असतील आणि त्यांचा फक्त गुदाम म्हणून वापर होत असेल, तर असे गाळे बाजार समिती जप्त करू शकते, अशी तरतूद आहे. याच तरतुदीनुसार असे गाळे जप्त करण्यात येणार असून, नियमानुसार आणि प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांनाच गाळे दिले जाणार आहेत, असेही सभापती देवीदास पिंगळे यांनी सांगितले. 

हेही वाचा - ह्रदयद्रावक! जीवलग मित्राच्या मृत्यूनंतर अवघ्या दोन दिवसातच निघाली अंत्ययात्रा; अख्खे गाव हळहळले

नाशिक बाजार समितीमध्ये धान्य व्यापाऱ्यांना मार्केट फी अत्यंत नगण्य असून, तीदेखील त्यांच्याकडून मिळत नसल्याने बाजार समितीला सुमारे शंभर कोटींचा फटका बसला आहे. -देवीदास पिंगळे, सभापती, नाशिक बाजार समिती