धान खरेदीचा शेतकऱ्यांना फायदाच होणार – नरहरी झिरवाळ

पेठ (नाशिक) : आधारभूत हमीभाव योजनेंतर्गत धान खरेदीचा शेतकऱ्यांना फायदाच होणार आहे. शेतकऱ्यांना या केंद्राजवळ लागणाऱ्या मूलभूत सोयी-सुविधाही लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी सांगितले. 

शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव तर मिळणारच

करंजळी (ता. पेठ) येथे आधारभूत हमीभाव योजनेंतर्गत धान खरेदी केंद्राच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. आमदार सुनील भुसारा, जिल्हा परिषद सदस्य भास्कर गावित, आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक जयराम राठोड, उपव्यवस्थापक रोहित बनसोडे, तहसीलदार संदीप भोसले उपस्थित होते. झिरवाळ म्हणाले, की आधारभूत हमीभावामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव तर मिळणारच आहे; पण त्यासोबत शेतमालाची विक्री करून मिळणारे पैसे संबंधित शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहेत. महामंडळ आधारभूत हमीभावापेक्षा कमी दराने धान खरेदी करणार नाही तसेच शेतकऱ्यांनीही इतर व्यापाऱ्यांना विक्री करताना हमीभावपेक्षा कमी दराने विकू नये म्हणजे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही. 

हेही वाचा > ३० क्विंटल कांदा घेऊन तोतया व्यापारी फरारी; कधी थांबणार शेतकऱ्याची फसवणूक?

आमदार सुनील भुसारा म्हणाले...

धान खरेदी केंद्राच्या ठिकाणी शेतकऱ्यांना मूलभूत सोयी सुविधा देण्यात येणार आहेत. वेळेत शेतमालाचे मोजमाप होऊन शेतकऱ्यांना त्या मालाचे पैसे मिळणार आहेत. खावटी योजनादेखील लवकरच सुरू होणार असून, ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, त्यांनी या योजनेचा लाभ घेऊ नये, असे आवाहन या वेळी केले. जयराम राठोड म्हणाले, की तीन वर्षांपासून नाशिक जिल्ह्यात आधारभूत हमीभाव केंद्रांतर्गत धान खरेदीत वाढ होत आहे. यापूर्वी रोखीने होणारे व्यवहार आता पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने शेतकऱ्याच्या बँक खात्यात होत आहेत. सध्या जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये एकूण २५ केंद्रे स्थापन होत आहेत. 

हेही वाचा > लिफ्ट देण्याच्या बहाण्याने करायचे लूटमार; मुंबईतील संशयिताच्या नाशिक पोलिसांनी आवळल्या मुसक्या