धामणीत अवघ्या दोन तासांतच टोमॅटो भुईसपाट; सोबत शेतकऱ्यांची स्वप्नेही!

खेडभैरव (जि.नाशिक) : इगतपुरी तालुक्यासह पूर्व भागात रब्बी हंगामात टोमॅटो या बागायती पिकाचे उत्पादन घेतले जाते. प्रामुख्याने दौंडत, उभाडे, धामणी, बेलगाव तऱ्हाळे, धामणगाव, साकूर, टाकेद, खेड आदी गावांतील परिसरात टोमॅटोची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र तीन- चार दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे टोमॅटो पीक भुईसपाट झाले आहे. 

चिंतातूर शेतकऱ्याची स्वप्नेही धुळीस; धामणीत टोमॅटो भुईसपाट 
अनेक शेतकऱ्यांनी पिकासाठी उधार, उसनवार करून टोमॅटोचे पीक उभे केले. मात्र डोळ्यासमोर पीक उद्ध्वस्त होत असल्याचे पाहून आता पुढे काय करायचे, असा प्रश्न त्यांच्यासह परिसरातील अनेक टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे. टोमॅटोप्रमाणे वांगे, काकडी आदी भाजीपाला पिकांचेही अवकाळीमुळे अतोनात नुकसान होत आहे. 

दोन तासांत टोमॅटो भुईसपाट 
यंदाच्या रब्बी हंगामात टोमॅटो पिकाची पुरती वाताहात झाली. धामणी (ता. इगतपुरी) येथील शेतकरी भाऊसाहेब भोसले यांनी दीड एकरवर या वर्षी टोमॅटोची लागवड केली होती. दीड एकर टोमॅटोचे पीक उभे करण्यासाठी त्यांना जवळपास दीड ते दोन लाख रुपये खर्च आला. मात्र शनिवारी पहाटे झालेल्या अवकाळी पावसाने एक ते दोन तासांत त्यांचे दीड एकर टोमॅटोची झाडे अक्षरशः भुईसपाट झाली. हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. 

हेही वाचा >  संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात

एक एकर टोमॅटो पिकासाठी साधारण खर्च 
• रोप व लागवड : १५ हजार ते २० हजार रुपये 
• ड्रीप व मल्चिंग : ३० हजार ते ५० हजार रुपये 
• खते व औषधे : २० हजार ते ४० हजार रुपये 
• तार व बांबू : ३० हजार ते ४० हजार रुपये 
• मजुरी : २० हजार ते २५ हजार रुपये. 
• एकूण साधारण खर्च : एक ते दीड लाख रुपये 

हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा

दीड एकरवर टोमॅटोच्या विरांग या वाणाची लागवड केली होती. आतापर्यंत दीड लाखावर खर्च झाला आहे. टोमॅटोचे उत्पादन सुरू होण्याच्या मार्गावर असतानाच, शनिवारी पहाटे अवकाळी पावसाने पूर्ण दीड एकरवरील टोमॅटोची वाताहात झाली. उधार, उसनवार करून पिकासाठी खर्च केला होता. मात्र आता उत्पादन होणार नसल्याने पुढे करायचे काय? हा प्रश्न आहे. - भाऊसाहेब भोसले, टोमॅटो उत्पादक शेतकरी, धामणी 

 

इगतपुरी तालुक्यासह पूर्व भागात रब्बी हंगामात सर्वांत जास्त टोमॅटो पिकाची लागवड केली जाते. मात्र यंदा अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणाने अनेक शेतकऱ्यांची टोमॅटो पिकासह अनेक भाजीपाला पिके अक्षरशः उद्ध्वस्त होत आहेत. शासनाने दखल घेऊन मदत करावी. - गौतम भोसले, उपसरपंच, धामणी, ता. इगतपुरी