धुक्यात हरवला महामार्ग अन् कसारा घाट; थंडीचा मुक्कामदेखील वाढण्याची शक्यता

इगतपुरी (नाशिक) : पावसाच्या माहेरघराबरोबरच थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या इगतपुरी तालुक्यासह कसारा घाट गुलाबी थंडतील धुक्यात हरवून जातो आहे. गडद धुक्यातील सगळा घाट परिसर गुडूप होत असल्याने महामार्गासह रस्ते वाहतूक संथ झाली आहे.

थंडीचा मुक्कामदेखील वाढण्याची शक्यता

परतीच्या पावसाने उशिरापर्यंत म्हणजे दिवाळीपर्यंत हजेरी लावल्याने तापमानात किमान घसरण होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. यादरम्यान दोन-तीन वेळा तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वातावरणात सातत्याने बदल जाणवतो आहे. चार-पाच दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला असून, काही दिवसांत तापमान आणखी खाली जाण्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. यंदा विक्रमी पाऊस झाल्याने दोन महिन्यांत थंडीची विक्रमी नोंद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याचा अंदाज इगतपुरी तालुक्यात येऊ लागला आहे. सकाळ आणि सायंकाळी तापमानात घट होऊन रात्रीचा गारवा वाढू लागला आहे. यंदा थंडीच्या विक्रमाबरोबरच थंडीचा मुक्कामदेखील वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.