Site icon

धुळे : आपत्ती काळात मदतीसाठी पथके गठित करावीत : जिल्हाधिकारी जलज शर्मा

धुळे : पुढारी वृत्तसेवा

आपत्तीच्या काळात जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी सतर्क राहून 24 तास सुरू राहील असा नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावा. आपत्ती काळात तत्काळ मदतीसाठी गस्ती पथके नियुक्त करावीत. धोकेदायक ठिकाणांची निश्चिती करून खबरदारीचा उपाय म्हणून तेथे सूचना फलक तातडीने लावावेत. रेनगेजची तपासणी करून यंत्रणा सुस्थितीत ठेवावी. जलसंपदा विभागाने पूर रेषा निश्चितीची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी. अशा सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची नैसर्गिक आपत्ती, पूर नियंत्रण, वादळ आदींबाबत मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अश्विनी पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस.  महानगरपालिकेचे आयुक्त देवीदास टेकाळे, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अरविंद अंतुर्लीकर, शिरपूरचे प्रांताधिकारी प्रमोद भामरे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कुरबान तडवी, शिक्षणाधिकारी माध्यमिक मोहन देसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे उपविभागीय अधिकारी चंद्रकांत पारस्कर, तहसीलदार गायत्री सैंदाणे (धुळे ग्रामीण), महेंद्र माळी (शिरपूर) आदींसह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी  शर्मा म्हणाले, पावसाळ्यातील आपत्तीच्या दुर्घटना टाळण्यासाठी प्रत्येक विभागाने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करावा. तसेच प्रत्येक शासकीय विभागाने समन्वयातून कामे करावीत. नदी, नाले काठावरील अनधिकृत बांधकामे संबंधित यंत्रणांनी तातडीने हटवावीत. तालुका, ग्रामपातळीवरील आराखडे अद्ययावत करून त्याचा अहवाल सादर करावा. स्थानिक स्वराज्य संस्थांनी मान्सून कालावधीत अग्निश्यमन यंत्रणा अद्ययावत करून तत्पर ठेवावी. जुन्या, पडक्या इमारतींची पाहणी करून योग्य ती कार्यवाही करावी. शासकीय इमारतींचे फायर ऑडिट करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा.

पूर परिस्थिती निर्माण झाल्यास शोध व बचाव कार्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दल, राज्य राखीव पोलिस दल, पोलिस, गृहरक्षक दलाचे जवान उपलब्ध करून द्यावेत. संबंधित यंत्रणांनी मंडळ व धरणांवरील पर्जन्यमापक यंत्रे अद्ययावत असल्याची खात्री करून घ्यावी. जलसंपदा विभागाने धरणातून पाणी सोडावयाच्या पाण्याचे नियोजन करावे. पाणी सोडण्यापूर्वी नदी काठावरील गावांना सतर्क करावे. धरणातील जलसाठ्याची अद्ययावत माहिती दररोज सादर करावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने झाडे पडून बंद पडलेले रस्ते तातडीने सुरू करण्यासाठी गस्ती पथके तैनात करावीत. माती, मुरुमाचे ढिगारे काढण्यासाठी साधनसामग्रीची उपलब्धता करून द्यावी.

पावसाळ्यात सतर्क राहावे

पावसाळ्यात साथीचे आजार पसरण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे आरोग्य यंत्रणांनी सतर्क राहावे. औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून घ्यावा. शुध्द पाण्याचा पुरवठा होईल, असे नियोजन करावे. सर्प प्रतिबंधक लसीचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवावा. जिल्हा पुरवठा विभागाने दुर्गम भागात अन्नधान्य वितरणाचे नियोजन करावे. आपत्ती काळात वीज पुरवठा खंडित झाल्यास वीज वितरण कंपनीने तो पूर्ववत करण्यासाठी विशेष पथके गठित करावीत. नियंत्रण कक्ष, धरण, पाणीपुरवठा योजना, शासकीय कार्यालयांचा वीज पुरवठा सुरळीत आणि अखंड सुरू राहील याची खबरदारी घ्यावी, अशाही सूचना जिल्हाधिकारी शर्मा यांनी दिल्या. यावेळी राज्य आपत्ती प्रतिसाद दल व महानगरपालिकेने तयार केलेल्या आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी अंतुर्लीकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे यांनी आपत्ती व्यवस्थापन आराखड्याची सविस्तर माहिती दिली.

हेही वाचा :

The post धुळे : आपत्ती काळात मदतीसाठी पथके गठित करावीत : जिल्हाधिकारी जलज शर्मा appeared first on पुढारी.

Exit mobile version