धुळे : आषाढी एकादशी, बकरी ईद एकाच दिवशी ; प्रशासनाचे शांततेचे आवाहन

धुळे बैठक,www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

बकरी ईद आणि आषाढी एकादशीचा सण रविवार 10 जुलै रोजी एकाच दिवशी येत आहेत. दोन्ही सण शांततामय आणि सौहार्दपूर्ण वातावरणात साजरे करून नागरिकांनी एकात्मतेचा संदेश द्यावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जलज शर्मा यांनी येथे केले.

बकरी ईद आणि आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात पोलिस प्रशासनातर्फे शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, महानगरपालिकेचे आयुक्त देवीदास टेकाळे, सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी ईश्वर कातकाडे व्यासपीठावर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी शर्मा यांनी सांगितले, यावर्षात झालेल्या सणांच्या वेळी धुळे जिल्ह्यातील नागरिकांनी जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासनाला नेहमीच सहकार्य केले. यातून नागरिकांनी एकात्मतेचा संदेश दिला आहे. त्यानुसार रविवारी येणारे दोन्ही सण नागरिकांनी एकोप्याने साजरे करावेत. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने पोलिस प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासनाला विविध सूचना केल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही सुरू झाली आहे.

पोलिस अधीक्षक पाटील यांनी सांगितले, आगामी सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलाने बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. बंदोबस्तासाठी राज्य राखीव पोलिस दल, गृहरक्षक दलाच्या जवानांची मदत घेण्यात येईल. रात्रीची गस्त वाढविण्यात आली आहे. प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. शनिवार शहरातून पोलिस दलाचे संचलन करण्यात येईल. तसेच नागरिकांनी सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये. नागरिकांनी या संदेशांची खात्री करून घ्यावी. धुळे शहरात सीसीटीव्ही यंत्रणा लवकरच कार्यान्वित करण्यात येईल. त्यासाठीचा नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.

महानगरपालिका आयुक्त टेकाळे यांनी सांगितले, आगामी सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुरेशा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. पथदिवे सुरू राहतील, अशी दक्षता घेण्यात आली आहे. पुरेसा पाणीपुरवठा करण्यात येईल. अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. स्वच्छतेसाठी 23 वाहने, स्वच्छता कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. आगामी सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि नियमांचे पालन करून पोलिस आणि जिल्हा प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. महानगरपालिका प्रशासनाने ईदच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता मोहीम राबवावी. पुरेसा पाणीपुरवठा करावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. यावेळी माजी आमदार प्रा. शरद पाटील, सामाजिक कार्यकर्ते एम. जी. धिवरे, मौलाना शकील, जमील मन्सुरी, अन्सारी आदींनी मनोगत व्यक्त केले. अपर पोलिस अधीक्षक बच्छाव यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. उपविभागीय पोलिस अधिकारी कातकडे यांनी आभार मानले. यावेळी शांतता समितीचे सदस्य, पोलिस दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा :

The post धुळे : आषाढी एकादशी, बकरी ईद एकाच दिवशी ; प्रशासनाचे शांततेचे आवाहन appeared first on पुढारी.