Site icon

धुळे : ईडीमुळे बंडाचा आरोप बिनबुडाचा – ना. गुलाबराव पाटील

धुळे : पुढारी वृत्तसेवा

ईडीच्या धाकामुळे आम्ही बंड केल्याचा आरोप केला जातो आहे. मात्र, हा आरोप खोटा आहे. माझी कोणतीही कंपनी नसून मी आजही 800 फुटांच्या घरामध्ये राहतो. त्यामुळे मला ईडीची कोणतीही भीती नसल्याचे सांगतानाच हिंदुत्वाशी फारकत घेतल्यामुळेच बंड केल्याचे प्रतिपादन राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. यावेळी त्यांनी शिवसेना वाढीसाठी आपले योगदान असल्याने 32 वर्षे वयाच्या आदित्य ठाकरेंनी आरोप करू नये, असा टोलादेखील लगावला.

धुळ्यामध्ये दसरा मेळाव्याच्या निमित्ताने हिंदू गर्व गर्जना मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने मार्गदर्शन करण्यासाठी राज्याचे पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांचे आगमन झाले होते. त्यावेळी ते बोलत होते. साक्रीच्या आमदार मंजुळा गावित, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी तसेच डॉ. तुळशीराम गावित, नंदुरबारचे वीरसिंग वसावे, सतीश महाले, मनोज मोरे, संजय गुजराथी यांची प्रमुख उपस्थिती होती. मेळाव्यात ना. पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांपासून शिवसेना दूर जात होती. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर युती केल्याने हिंदुत्वाशी त्यांनी फारकत घेतली. त्यामुळे आम्ही उठाव केला आहे. शिवसेनेमुळे आम्ही मोठे झालो अशी टीका केली जाते. मात्र, आम्हीदेखील आंदोलने करीत खस्ता खाल्ल्या. शिवसेनेला वाढवण्यात योगदान दिले. हिंदुत्वाचा मुद्द्यावरून शिवसेना दूर जात होती. शिवसेनेच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याच्या उद्धव ठाकरे यांना वेळोवेळी सूचना केल्या. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यानेच हा उठाव करावा लागला. आता ठाकरे यांच्या समर्थकांकडून आम्ही ईडीच्या धाकामुळे बाहेर पडल्याचा आरोप केला जातो. हा आरोप खोटा आहे. माझी कोणतीही कंपनी नाही. त्यामुळे मला ईडीला घाबरण्याचे कारणच नाही, असा टोला त्यांनी लगावला. शिवसेनेला योगदान देत असताना आम्ही 35 वर्षांपासून खस्ता खाल्ल्या. आता 32 वर्षे वयाचे आदित्य यांच्याकडून आमच्यावर गद्दार म्हणून टीका केली जाते. कोण आहेत हे आदित्य असा एकेरी उल्लेख करीत ना. पाटील यांनी आपला रोष व्यक्त केला. यावेळी त्यांनी धुळ्याचे सतीश महाले यांना विधानसभेच्या निवडणुकीसाठी आतापासून तयारी करण्याचे आवाहन करतानाच अप्रत्यक्षपणे धुळ्याची उमेदवारी जाहीर केली. यावेळी त्यांनी धुळे ग्रामीणचे माजी आमदार शरद पाटील यांच्यावरदेखील टीकेची झोड उठवली. पाटील यांना विजयी करण्यासाठी मी 50 पेक्षा जास्त सभा घेतल्या. आज तेच पाटील विरोधाच्या भूमिकेत असल्याचा टोला त्यांनी लगावला. दरम्यान, दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विचार ऐकण्यासाठी धुळेकर शिवसैनिकांनी अवश्य हजेरी लावावी, असे आवाहनदेखील त्यांनी केले.

हेही वाचा:

The post धुळे : ईडीमुळे बंडाचा आरोप बिनबुडाचा - ना. गुलाबराव पाटील appeared first on पुढारी.

Exit mobile version