धुळे : चाकूचा धाक दाखवून विद्यार्थ्यांना लुटणारे टोळके जेरबंद

धुळे; पुढारी वृत्तसेवा : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एकटे गाठून त्यांना शस्त्राचा धाक दाखवून लूट करणाऱ्या टोळक्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने गजाआड केले आहे. या टोळक्याकडून चोरीस गेलेले दागिने हस्तगत करण्यात आले.

धुळे शहरात राहणारे गायत्री राकेश महाजन आणि अनिरुद्ध अतुल बागुल या दोघा विद्यार्थ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दोन विद्यार्थ्यांना शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्याकडून ऐवज हिसकावून घेतल्याचा प्रकार घडला होता. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांना या गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी तपास सुरू केला. या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार वडेल रोड परिसरात सुनील रामू मरसाळे हा त्याच्या साथीदारांच्या मदतीने चाकूचा धाक दाखवून जबरीने सोन्याचे दागिने व पैसे काढून घेत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील, उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, योगेश राऊत तसेच अशोक पाटील, संजय पाटील, कुणाल पानपाटील, उमेश पवार, रविकिरण राठोड, विशाल पाटील यांनी वडेल रोड परिसरात सापळा लावला.

या पथकाने सुनील रामू मरसाळे, गणेश जुगनू मराठे आणि मोहित अजय कुमार चव्हाण या तिघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता या तिघांनी १ जुलैरोजी सकाळी ११ च्या सुमारास वडेल ते नगाव वारी परिसरात मोहित चव्हाण यांच्या (एमएच 18 ए क्यू 957) दुचाकीवरून फिरत असताना नगाव रोडवरील पुलाजवळ उभ्या असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांची सोन्याची चैन आणि पैसे काढून घेतल्याची कबुली दिली.

त्याचप्रमाणे सुनील मरसाळे आणि मोहित चव्हाण या दोघांनी याच दिवशी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास वडेल चौफुली जवळ फोटोसेशन करणाऱ्या दोघा विद्यार्थिनींना चाकूचा धाक दाखवून त्यांचे सोन्याचे दागिने हिसकावून घेतल्याची कबुली दिली. या आरोपींकडून सुमारे ७२ हजार रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

हेही वाचलंत का ? 

The post धुळे : चाकूचा धाक दाखवून विद्यार्थ्यांना लुटणारे टोळके जेरबंद appeared first on पुढारी.