धुळे: चारणपाडा येथे आदिवासी दिनाचा बॅनर फाडल्यावरून दोन गटांत राडा

हाणामारी

धुळे, पुढारी वृत्तसेवा : जागतिक आदिवासी दिनानिमित्त लावण्यात आलेले बॅनर फाडल्याच्या कारणावरून शिरपूर तालुक्यातील चारणपाडा गावात दोन गटात तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे. यावेळी झालेल्या दगडफेकीमध्ये चार जण जखमी झाले असून त्यांना शिरपूर रुग्णालयात दाखल केले आहे. या दगडफेकीचा फटका पोलिस आणि आमदार काशीराम पावरा यांच्या वाहनाला देखील बसला आहे.

शिरपूर तालुक्यातील सांगवी परिसरात मुंबई आग्रा महामार्ग लगत चारणपाडा हे गाव आहे. या गावात जागतिक आदिवासी दिनानिमित्त बॅनर लावण्यात आले होते. हे बॅनर अज्ञात व्यक्तींनी फाडल्याचे निदर्शनास आल्यानंतर एक जमाव संशयितांकडे विचारणा करण्यासाठी गेले. यावेळी दुसऱ्या गटाकडून देखील आक्रमक भूमिका घेण्यात आल्यामुळे दोन्ही गट एकमेकाला भिडले. यावेळी दोन्ही गटांकडून तुफान दगडफेक सुरू झाली. यात चार जण जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच शिरपूर तालुक्यातील पोलीस पोलिसांची कुमक घटनास्थळी रवाना झाली.

मात्र, तत्पूर्वी दोन्ही गटांनी आक्रमक भूमिका घेतली. दगडफेकीचा फटका पोलीस गाड्यांना तसेच जमावाला समजावण्यासाठी गेलेल्या आमदार काशीराम पावरा यांच्या गाडीला देखील बसला. फलक फाडणाऱ्या संबंधितांना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी मुंबई- आग्रा महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. मात्र, पोलिसांनी बळाचा वापर करून जमाव पांगवला. दरम्यान, चरणपाडा गावात आता शांतता असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, तसेच शांतता राखावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा 

The post धुळे: चारणपाडा येथे आदिवासी दिनाचा बॅनर फाडल्यावरून दोन गटांत राडा appeared first on पुढारी.