Site icon

धुळे : चिमठाणे गावातून शेतकऱ्याचा ट्रॅक्टर चोरणारा चोरटा गजाआड

धुळे : पुढारी वृत्तसेवा

शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणा गावातून ट्रॅक्टर चोरणाऱ्या चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने गजाआड केले आहे. अन्य एका कारवाई मध्ये वीज वितरण कंपनीचे साहित्य चोरणाऱ्या दोघांना देखील बेड्या ठोकण्यात यश आले आहे. या चोरट्यांकडून आणखी काही चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी व्यक्त केली आहे.

चिमठाणे गावातून राहुल बाबुराव पाटील यांच्या मालकीचे ट्रॅक्टर मध्यरात्री चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली. या प्रकरणात शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार अजय उर्फ गणेश आसाराम कोळी यांनी हा ट्रॅक्टर धुळे तालुक्यातील न्याहळोद गावात विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सहाय्यक निरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी तसेच संजय पाटील, धनंजय मोरे, श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, मायुस सोनवणे, कैलास महाजन, राहुल गिरी, कमलेश सूर्यवंशी, देवेंद्र ठाकूर, राजू गीते या पथकाने न्याहळोद गावातून अजय उर्फ गणेश आसाराम कोळी याला ट्रॅक्टरसह ताब्यात घेतले आहे. कोळी याने बनावट चावीच्या माध्यमातून ट्रॅक्टर पळवून नेल्याचे त्यांनी प्राथमिक तपासात सांगितले. त्याची चौकशी केली असता चोरीस गेलेले ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहे. दरम्यान प्राथमिक तपासात त्याने शिंदखेडा तालुक्यात जबरी चोरीच्या आणखी दोन गुन्हे केले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

वीज कंपनीला चुना लावणारे दोघे अटकेत

दरम्यान, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने वीज कंपनीचे साहित्य चोरणाऱ्या दोघांना बेड्या ठोकण्यात यश मिळाले आहे. धुळे शहरातील साक्री रोडवर असणाऱ्या विद्युत महामंडळाच्या पोलवरून सी चॅनेल चोरीस गेल्याची घटना घडली होती. या प्रकरणात वासुदेव अरुण मालचे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात देखील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील यांनी धुळे शहरात राहणारा फजलूर रहमान अन्सारी ,अब्दुल वारी अब्दुल शकूर या दोघांना ताब्यात घेतले. या दोघांची चौकशी केली असता त्यांनी (एम एच 18 एन 71 78) क्रमांकाचे रिक्षा मधून चोरलेले साहित्य विल्हेवाट लावण्यासाठी घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहे. त्यांच्या ताब्यातून सुमारे 53 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

The post धुळे : चिमठाणे गावातून शेतकऱ्याचा ट्रॅक्टर चोरणारा चोरटा गजाआड appeared first on पुढारी.

Exit mobile version