
धुळे : पुढारी वृत्तसेवा
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतंर्गत पात्र शेतकरी कुटुंबास 2 हजार रुपये प्रती हप्ता याप्रमाणे प्रती वर्षी 6 हजार रुपयांचा लाभ देण्यात येतो. योजनेच्या 13 व्या हफ्त्याचा लाभ जमा करण्याची कार्यवाही सध्या सुरू आहे. केंद्र शासनाने 13 व्या हफ्त्याचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्याचे बँक खाते आधार क्रमांकास जोडणे बंधनकारक केले आहे. जिल्ह्यातील एकूण 28 हजार 895 लाभार्थ्यांची बँक खाती अद्याप त्यांच्या आधारक्रमांकास जोडलेली नाहीत. त्यामुळे या लाभार्थ्यांच्या खात्यात 13 व्या हफ्त्याचा लाभ जमा करता येणार नाही अशी माहीती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली.
असे करा खाते लिंक…
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या प्रलंबिल लाभार्थ्यांना त्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा त्यांच्या गावातील पोस्ट मास्टर यांच्यामार्फत उपलब्ध करण्यात आली आहे. यासाठी आपले आधार कार्ड, मोबाईल क्रमांक या कागदपत्रांचे आधारे इंडीया पोस्ट पेमेंट बँकेत (आयपीपीवी) आपल्या गावातील पोस्ट विभागाचे कर्मचारी यांच्यामार्फत खाते उघडावे. हे बँक खाते आपल्या आधार क्रमांकाशी 48 तासात जोडले जाईल. ही पद्धत कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांशिवाय करता येणार असल्याने अत्यंत सोपी व सुलभ आहे. आयपीपीबी मध्ये बँक खाते सुरू करण्याची सुविधा आपल्या गावातील पोस्ट कार्यालयातच उपलब्ध असल्याने लाभार्थीना इतरत्र जाण्याची गरज पडणार नाही.
योजनेतील प्रलंबित लाभार्थ्यांची खाती आयपीपीबी मध्ये उघडून ती आधार क्रमांकास जोडण्यासाठी आयपीपीबी कार्यालयास गावनिहाय याद्या उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याप्रमाणे गावातील पोस्ट मास्टर या लाभार्थ्यांना संपर्क करून आयपीपीबी मध्ये बँक खाती सुरू करतील. आयपीपीवीमार्फत आयोजित या मोहिमेमध्ये जिल्ह्यातील सर्व प्रलंबित लाभार्थीनी त्यांचे बँक खाते उघडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शर्मा यांनी केले आहे.
हेही वाचा:
- Rohit Sharma : रोहित शर्माने केली एमएस धोनीच्या ‘त्या’ विक्रमाशी बरोबरी!
- नाशिक : कंत्राटी सफाई कामगारांचे मनसे पदाधिकाऱ्यांसह उपोषण
- Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात उद्यापासून सुनावणी
The post धुळे जिल्ह्यात 28 हजार 895 शेतकऱ्यांचे खाते आधार लिंक पासून वंचित appeared first on पुढारी.