धुळे : तरुणावर धारदार शस्त्राने वार करून मोबाईल व रोकड लांबवणाऱ्या दोघांना बेड्या

अटक

धुळे : पुढारी वृत्तसेवा

तरुणावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा मोबाईल आणि रोकड लांबवणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने गजाआड केले आहे. यातील दोघा आरोपींवर धुळे शहर तसेच उल्हासनगर येथील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी दिली आहे.

धुळे शहरातील कृष्णा हॉटेल नजीकच्या वळण रस्त्याने देवेंद्र पृथ्वीराज पाटील हे पायी जात असताना त्यांना दुचाकीवरून आलेल्या तिघा अनोळखी तरुणांनी अडवले. यावेळी देवेंद्र पाटील यांच्या हातावर तीक्ष्ण हत्याराने वार करून त्यांचा मोबाईल आणि पॅन्टच्या खिशातून १६०० रुपये बळजबरीने हिसकावले. यानंतर तिघाही हल्लेखोर तरुणांनी दुचाकीवरून पलायन केले. या संदर्भात पृथ्वीराज पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तालुका पोलीस ठाण्यात भादवि कलम 394, 34 अन्वये गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्या संदर्भात पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांना आदेश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने माहिती काढली असता जळगाव येथील जानकी नगर मध्ये राहणारा गोपाल गोपी रावळकर याने हा गुन्हा केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पथकाने त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने धुळ्याच्या चितोड रोडवरील क्रांती चौकात राहणारा शंकर रतन साळुंखे आणि साहिल सुनील केदार या दोघांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली.

त्यानुसार पोलीस पथकाने तातडीने हालचाली करून शंकर साळुंखे याला देखील ताब्यात घेतले. या दोघांकडून चोरीस गेलेला मोबाईल जप्त करण्यात आला. आरोपी साहिल केदारे हा अध्याप फरार असून पोलीस पथक त्याचा शोध घेत आहे. दरम्यान शंकर साळुंखे यांच्यावर धुळे शहर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल असून साहिल केदार याच्यावर उल्हासनगर मधील सेंट्रल पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल असून धुळे शहरात एक गुन्हा दाखल आहे. या व्यतिरिक्त या तिघा आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासून पाहिली जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील यांनी दिली आहे.

हेही वाचा :

The post धुळे : तरुणावर धारदार शस्त्राने वार करून मोबाईल व रोकड लांबवणाऱ्या दोघांना बेड्या appeared first on पुढारी.