धुळे : दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी राष्ट्रवादीचा महानगरपालिकेवर मोर्चा

धुळे: राष्ट्रवादी मोर्चा

धुळे : पुढारी वृत्तसेवा

दिव्यांगांच्या समस्या सोडवाव्या या मागणीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग आघाडीने महानगरपालिकेवर मोर्चा काढला या मागण्या सोडवण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. या मागण्या सोडवण्यासाठी प्राधान्य देण्याचे आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, दिव्यांग आघाडी धुळे शहर व अपंग पुनर्विकास संस्था संघटना यांच्या वतीने दिव्यांग बांधवांच्या विविध मागणीबाबत धुळे महानगरपालिकेवर मोर्चा नेण्यात आला. यावेळी दिव्यांग आघाडी मार्फत विविध मागण्यांसंदर्भात महापालिकेच्या उपायुक्त डॉ. सविता नांदुरकर यांच्या समवेत चर्चा करण्यात आली.

यात दिव्यांगांच्या नोंदणीसाठी महानगरपालिकेने शिबिर घ्यावे, दिव्यांगांसाठी राखीव असलेला 5 टक्के निधी पूर्ण खर्च करावा, दिव्यांगांसाठी धुळे शहरात भवन बांधण्यात यावे, बेघर असलेल्या दिव्यांगांसाठी नवीन घरकुल वसाहत निर्माण करावी, दिव्यांगांना व्यवसायासाठी धुळे महानगरपालिकेने जागा उपलब्ध करून द्यावी, धुळे शहरातील सर्व दिव्यांग बांधवांचा मोफत विमा काढण्यात यावा, दिव्यांग समितीची दर तीन महिन्यात वेळेवर बैठक घेण्यात यावी, दिव्यांग विभागासाठी स्वतंत्र अधिकारी, कर्मचारी यांची नेमणूक करण्यात यावी, दिव्यांग बांधवांना व दिव्यांग बचत गटांना कर्ज उपलब्ध करून द्यावे. अशा विविध प्रकारच्या मागण्या यावेळी महानगरपालिकेच्या उपायुक्त डॉ. संगीता नांदुरकर यांच्या समोर ठेवण्यात आल्या. सदर निवेदनातील मागण्यांबाबत चर्चा करून लवकरात लवकर योग्य निर्णय येईल असे आश्वासन उपायुक्त डॉ. नांदुरकर यांनी यावेळी सांगितले.

या मोर्चाचे नियोजन राष्ट्रवादी दिव्यांग आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय सरग यांनी केले होते. यात रणजीत भोसले, यशवंत डोमाळे, मंगेश जगताप, भिका नेरकर, लखन चांगरे, उमेश महाले, राजेंद्र सोलंकी, संजय माळी, हाशिम कुरेशी, दीपक देवरे, जितेंद्र पाटील, निखील पाटील, कुणाल वाघ, रामेश्वर साबरे, असलम खाटिक, अमित शेख, डॉमनि मलबारी, पांडुरंग नरव्हाळ, तरुणा पाटील, भारती तावडे, मंगला पाटील आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संखेने उपस्थित होते.

हेही वाचा :

The post धुळे : दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी राष्ट्रवादीचा महानगरपालिकेवर मोर्चा appeared first on पुढारी.