धुळे : दुधात भेसळ आढळलेल्या ६ दूध विक्रेत्यांवर कारवाई

धुळे; पुढारी वृत्तसेवा : धुळे जिल्ह्यात दुध व दुग्धजन्य पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी जिल्हास्तरीय समन्वय समितीची स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या संयुक्तीक पथकांने आज दुधात भेसळ आढळलेल्या 6 दुध विक्रेत्यावर कारवाई केली आहे.

ही कारवाई समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, अपर पोलिस अधिक्षक किशोर काळे यांचे मार्गदर्शनाखाली अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त (अन्न) संतोष कांबळे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. आर. एम. शिंदे, जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी, डॉ. अमित पाटील, अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बाविस्कर, सहाय्यक नियंत्रक, वैधमापनशास्त्र आर. सी. पाटील, सहायक जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी, व्ही. व्ही. गरुड, विस्तार संकलन प्रितेश गोंधळी, पोलीस विभागातील पोलीस नाईक अतुल बागुल, अतुल पिंगळकर तसेच वसुधारा दूध डेअरीतील दूध तपासणी तंत्रज्ञ मनोज पाटील यांच्या पथकाने ही तपासणी केली.

या पथकाने धुळे शहरातील साक्री रोड, साक्री नाका परिसरात दूध वाहतुक, दूध पुरवठादार, फेरीवाले यांचेकडील दुधाची अचानक तपासणी (दुध लैक्टोस्कॅन) या स्वयंचलित उपकरणाद्वारे करण्यात आली. या तपासणीत शासनाने निर्धारीत केलेल्या निकषाप्रमाणे निर्धारीत केलेली गुणप्रत गाय दुधाकरीता 3.5/8.5 व म्हैस दुधाकरीता 6.0/ 9.0 याप्रमाणे दूधातील फॅट व एस.एन.एफची तुलनात्मक पडताळणी करण्यात आली. या कारवाईमध्ये एकुण 11 दुध विक्रेत्यांच्या दुधाचे नमुने कार्यवाहीस्थळी तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी एकुण 6 दुध विक्रेत्यांच्या दूधात पाण्याची भेसळ त्या-त्या प्रमाणात आढळून आली आहे.

भेसळ आढळुन आलेले सरासरी एकुण 160 लिटर दुध त्वरीत नष्ट करण्यात आले. तसेच वैध मापन शास्त्र विभाग, धुळे यांच्यासोबत संयुक्तीक पथकाव्दारे बजरंग दूध डेअरी, साक्री रोड, धुळे यांचेकडील दुध मोजण्याच्या मापांची पडताळणी करण्यात आली असता, सदरच्या डेअरीतील मापे ही अवैध स्वरुपाची आढळुन आल्याने वैध मापन शास्त्र अधिनियम 2009 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यांत आला आहे.

धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील दुध विक्रेत्यांना कळविण्यात येते की, दुध भेसळ करणे हा कायद्याने गुन्हा असून दुध भेसळ करणाऱ्यांवर यापुढील काळात कठोर कारवाई करण्यात येईल, असा ईशारा जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी डॉ. अमित पाटील, अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त संतोष कांबळे यांनी दिला आहे.

The post धुळे : दुधात भेसळ आढळलेल्या ६ दूध विक्रेत्यांवर कारवाई appeared first on पुढारी.