धुळे : देशात भाजपमुळे लोकशाही धोक्यात : थोरात; कापडणेत काँग्रेसच्या पदयात्रेस जोरदार प्रतिसाद

धुळे www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

भूलथापा देऊन देशात भाजपने सत्ता हस्तगत केली. आज देशामध्ये पेट्रोल-डिझेल, धान्य, दूध, पीठावर कर लावला जात आहे. प्रचंड महागाई वाढली आहे. गरिबांचे जगणे हराम करण्याचे काम देशात भाजपकडुन केले जात आहे. ईडी, सीबीआयसारख्या यंत्रणांचा वापर करून लोकशाही धोक्यात आणली जात आहे. त्यामुळे देशाची लोकशाही वाचवण्याची वेळ आली आहे. त्यासाठी सर्वांनी संघटितपणे उभे राहावे, असे आवाहन माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आज येथे केले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने धुळे तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वातंत्र्यसैनिकांची भूमी कापडणे येथून काँग्रेस पक्षाच्या आजादी गौरव पदयात्रेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी कापडणे येथील स्वातंत्र्यसैनिकांचे परिवार तसेच आजी-माजी सैनिकांचा आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.  कापडणेतील गाव दरवाजाजवळील चौकात झालेल्या सभेत बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, स्वातंत्र्यसैनिकांचा वारसा धुळे जिल्ह्यात आमदार कुणाल पाटील हे समर्थपणे चालवीत आहेत. स्वातंत्र्याचा पाया लोकशाहीवर अवलंबून असून, गांधीजी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणीनुसार लोकशाही निर्माण झाली आहे. इंदिरा गांधींनी अनेक परकीय लढायांना तोंड देत भारतीय स्वातंत्र्य अबाधित राखण्याचे काम केले. आज मात्र भूलथापा देऊन सत्तेवर आलेल्या सत्ताधाऱ्यांनी देशातील लोकशाही धोक्यात आणण्याचे काम केले आहे. लोकशाही धोक्यात आली असून, स्वातंत्र्याचा इतिहास मांडण्यासाठी ही पदयात्रा आहे. यासाठी सर्वांनी या लढ्यामध्ये खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. 

यावेळी पदयात्रेत उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांनी सांगितले की, येणाऱ्या पिढीला स्वातंत्र्याची प्रेरणा मिळावी म्हणून काँग्रेसने ही पदयात्रा काढलेली आहे.  कापडणे येथून निघालेली आजादी गौरव पदयात्रेचा देवभाने, सरवडमार्गे सोनगीर येथे शहीद नीलेशदादा महाजन यांच्या स्मारकाला अभिवादन केले. त्यानंतर समारोप करण्यात आला.  पदयात्रेमध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात, महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील, आ. सुधीर तांबे, सहप्रभारी प्रदीप राव, महाराष्ट्र काँग्रेसचे उपाध्यक्ष भाई नगराळे, माजी आ. डी. एस. अहिरे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्यामकांत सनेर, काँग्रेसचे प्रदेश सचिव युवराज करनकाळ, अश्विनी पाटील, डाॅ. ममता पाटील, महिला काँग्रेस अध्यक्षा गायत्री जयस्वाल, सचिव डाॅ. दरबारसिंग गिरासे, खरेदी-विक्रीचे चेअरमन लहू पाटील यांच्यासह धुळे तालुक्यातील सर्व पदाधिकारी यात्रेमध्ये सहभागी झाले होते.

मुसळधार पावसाने रंग भरला 

काँग्रेस पक्षाच्या आजादी गौरव पदयात्रेत मुसळधार पावसाने हजेरी लावली. देवभानेपासून थेट सोनगीरपर्यंत मुसळधार पाऊस सुरू झाला. मुसळधार पावसामध्ये भिजत आ. कुणाल पाटील यांनी पदयात्रेत आजादीचे रंग भरले. सोनगीरपर्यंत एक तास पायी चालत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला.

हेही वाचा:

The post धुळे : देशात भाजपमुळे लोकशाही धोक्यात : थोरात; कापडणेत काँग्रेसच्या पदयात्रेस जोरदार प्रतिसाद appeared first on पुढारी.