धुळे : धान्याच्या पॅकिंगवर जीएसटी लावण्यास व्यापारी महासंघाचा विरोध

GST Collectionpudharinews

धुळे; पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारच्या पॅकिंग धान्यावर जीएसटी लावण्याचा निर्णयाविरोधात धुळे व्यापारी महासंघाने आक्रमक भूमिका घेतली आहे. या निर्णयाविरोधात सोमवारी (दि.४) जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन या निर्णयाच्या अंमलबजावणीस विरोध करण्यात येणार आहे.

यासंदर्भात धुळे व्यापारी महासंघाचे पदाधिकारी नितीन बंग यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. शासनाने आता कोणत्याही पॅकिंगच्या धान्यावर ५ टक्के जीएसटीची आकारणी केली जाणार आहे, असे जाहीर केले आहे. केंद्राचा हा निर्णय छोटया व्यापारी वर्गासाठी मारक ठरणार आहे. व्यापारी वर्गाला अजून एक नवीन कराचा भार सहन करावा लागणार आहे. यासाठी नव्याने कर सल्लागार, लेखापरिक्षक व संगणकाचा खर्च वाढणार आहे. इतकेच नाही, तर सर्व सामान्य नागरिकांनाही यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. या वाढीव करामुळे सामान्यांचे बजेट चुकणार आहे. अन्न, वस्त्र निवारा या मूलभूत गरजांना किमान कर कक्षेतून दूर ठेवाव्या, हीच भारतीय नागरिक या नात्याने मागणी आहे.

केंद्र शासनाच्या या निर्णयाची अंमलबजावणी होऊ नये, यासाठी ज़िल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी व्यापारी बांधवांनी सोमवारी (दि. ४) दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपस्थित राहावे, असे आवाहन धुळे व्यापारी महासंघाचे नितीन बंग यांनी केले आहे.

हेही वाचलंत का ? 

The post धुळे : धान्याच्या पॅकिंगवर जीएसटी लावण्यास व्यापारी महासंघाचा विरोध appeared first on पुढारी.