Site icon

धुळे : नालेसफाईच्या नावाने कोट्यावधींची बिले काढल्याचा आरोप, नाल्याच्या काठावर जाऊन शिवसेनेचे आंदोलन

धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळे शहरातील नालेसफाई झाली नसल्याची बाब आज शिवसेनेने आंदोलनाच्या माध्यमातून निदर्शनास आणून दिली. महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपाचा गट आणि अधिकाऱ्यांनी पावसामुळे नाल्यांच्या माध्यमातून होणाऱ्या दुर्घटना टाळणे ऐवजी कोट्यवधी रुपयांची बिले काढण्याकडे लक्ष केंद्रित केले असल्याचा खळबळ जनक आरोप यावेळी करण्यात आला.

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज शहरातील 10 ते 12 नाल्यांसह उपनाल्यांना भेटी देऊन प्रत्यक्ष पहाणी केल्यावर या नाल्यात प्रचंड घाणीचे साम्राज्य आढळून आले. सत्ताधारी भाजप नगरसेवकांनी धुळेकर जनतेच्या आरोग्याशी चालविलेला खेळ मनपाने थांबवावा मनपा आयुक्तांनी फक्त कॅबिन मधे बसून कारभार न पाहता प्रत्यक्षात नालेसफाईवर लक्ष केंद्रित करावे असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आले. आंदोलनाच्या वेळी मनपा आरोग्य विभाग व मनपा प्रशासन यांच्या बेजबाबदार काराभारा विरोधात घोषणाबाजी  करण्यात आली.

नालेसफाईच्या मुद्द्यावरून यावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले. धुळे शहरातील मुख्य व दाट लोकवस्तीच्या भागातूव मोतीनाला, सुशीनाला, हमाल मापाडी, चिरंतन हाॅस्पीटल ते चंदन नगर, अग्रवाल नगर आदी परिसरातून मुख्य नाले वाहतात. या नाल्यांना जोङणारे शहरात जवळपास 22 ते 25 उपनाले असून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अद्यापही या नाल्यांची दहा टक्के ही सफाई महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाकडुन करण्यात आलेली नाही. दरवर्षी नालेसफाईच्या नावाने जे.सी.बी. व इतर साहित्य उपलब्ध करून घेण्यासाठी कोट्यावधींची बिले काढली जातात. मात्र प्रत्यक्षात ही नालेसफाई कागदावरच दाखवीली जाते. या नाल्यांची सफाई शहरातील प्रमुख रस्त्यांच्या कॉर्नर साईडवरच केली जाते. नाल्याच्या आतल्या भागात मात्र ही नालेसफाई केलीच जात नाही असा आरोप ठाकरे गटाने ठेवला.

नालेसफाई सर्दंभात नुकतीच गेल्या आठवडयात मनपा आयुक्त यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीत आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी नालेसफाई 50 टक्के पुर्ण झाल्याचे आयुक्तांना ठासून सांगितले. आयुक्तांनी देखील त्याची शहनिशा न करता मोठ्या आवाजात नालेसफाई झाल्याचे जाहीर करून टाकले. आज मात्र या नालेसफाई बाबत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील विविध नाल्यांना भेट देऊन नालेसफाईचा ऑन द स्पाॅट पंचनामा करून नालेसफाई बाबत आरोग्य विभागाचे चांगलेच वाभाडे काढले. पावसाळ्यापूर्वी नाल्यात या आधी साचलेला गाळ, प्लॅस्टिक  मटेरियल, नाल्याच्या आजुबाजूस वाढलेली काटेरी वृक्ष यांची सफाईच अद्यापही करण्यात आलेली नाही. नालेसफाई साठी लागणारे जे.सी.बी.मशीनच महापालिकेकडे टेंङर काढुनही अद्यापही उपलब्ध झालेले नाही. गेल्या वर्षी सुशीनाल्या वरील अतिक्रमणामुळे अनेक वसाहतीत पाणी घुसले व नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता. या ठिकाणी जिल्हाधिकारींनी पाहणी केली व  नाल्यावरील अतिक्रमीत घरे तात्काळ काढण्याची सुचना करून देखील अतिक्रमणे काढली गेली नाहीत. नालेसफाई बाबत सत्ताधारी भाजपा नगरसेवकच उदासिन असून नालेसफाईचे कोणतेही सोयरसुतक त्यांना नाही. फक्त गटारी, रस्ते, यांची वाढीव टेंडर बनवून बनविलेली बिले काढण्यात ते आपली धन्यता मानत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला.

या प्रसंगी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख महेश मिस्त्री, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, महानगरप्रमुख धीरज पाटील, डॉ. सुशील महाजन, भरत मोरे, देविदास लोणारी, ललित माळी, गुलाब माळी, मच्छिंद्र निकम, सुनिल पाटील, विनोद जगताप, संदिप सुर्यवंशी, संजय जवराज, प्रविण साळवे, छोटुभाऊ माळी, आण्णा फुलपगारे, कैलास मराठे, पंकज भारस्कर,  दिनेश पाटील, मुन्ना पठाण, पिनुभाऊ सुर्यवंशी, प्रकाश  शिंदे, अजय चौधरी, मनोज शिंदे, सागर निकम, अनिल शिरसाट, अमोल ठाकूर, सागर भडांगे आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

The post धुळे : नालेसफाईच्या नावाने कोट्यावधींची बिले काढल्याचा आरोप, नाल्याच्या काठावर जाऊन शिवसेनेचे आंदोलन appeared first on पुढारी.

Exit mobile version