धुळे : नुकसानीचे पंचनामे करुन सरसकट मदत द्या, तालुका काँग्रेसची मागणी

धुळे कॉंग्रेस,www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळे तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून अतिवृष्टीच्या पावसाने थैमान घातले असून कपाशी, मका पिकासह खरीप पिकांचे आणि अनेक गावातील घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचा तातडीने पंचनामा करुन तालुक्यातील प्रत्येक शेतकर्‍यांना सरसकट शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे धुळे तालुका काँग्रेस कमिटीतर्फे करण्यात आली.

धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील यांच्या सूचनेनुसार धुळे तालुका काँग्रेस पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची भेट घेवून निवेदन दिले. यावेळी जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा करतांना काँग्रेस पदाधिकार्‍यांनी धुळे तालुक्यातील शेतकर्‍यांची व्यथा मांडली. गेल्या एक आठवड्यापासून धुळे तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. या अतिवृष्टीमुळे धुळे तालुक्यात कापूस, मका, बाजरी, ज्वारी, कांदा, कडधान्य यासह फळबागायत व भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचल्याने वेचणीला आलेला कापूसही पाण्यात बुडाला आहे. तसेच सततच्या पावसामुळे कापसाची बोंडे कुजल्याने शेतकर्‍यांच्या उत्पन्नात घट होवून प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान शेतात पाणी साचल्यामुळे खरीपाची इतर पिकेही पाण्याखाली गेली आहेत. तसेच मुसळधार व सततधार पावसाचा परिणाम होवून धुळे तालुक्यातील प्रत्येक गावातील असंख्य घरांची पडझडही झाली आहे. त्यामुळे त्या घरात राहणार्‍या कुटूंबाच्या संसारोपयोगी वस्तूंचेही नुकसान झाले आहे. परिणामी असंख्य कुटूंब उघड्यावर पडली आहेत. म्हणून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या खरीप पिकांचा व पडझड झालेल्या घरांचा युध्दपातळीवर महसूल व कृषी विभागाला पंचनामा करण्याच्या सूचना द्याव्यात आणि सरसकट 100 टक्के नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी यावेळी निवेदनातून करण्यात आली.

यावेळी खरेदी विक्री संघाचे चेअरमन लहू पाटील, पं.स.चे माजी सदस्य पंढरीनाथ पाटील, काँग्रेस अवजड वाहतूक शाखेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब पाटील, काँग्रेसचे नेते एन.डी.पाटील, संचालक बापू खैरनार, संचालक संतोष राजपूत, ज्येष्ठ नेते दिलीप गिरासे, राजेंद्र पाटील, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष गणेश गर्दे, उपसरपंच हिरामण पाटील, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष हरिष पाटील, शिवाजी अहिरे, नवल पाटील, रामराव पाटील, प्रविण माळी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

भरपाईसाठी पाठपुरावा

धुळे तालुक्यातील झालेल्या अतिवृष्टीची माहिती घेवून नुकसानीचा तातडीने पंचनामा करण्याच्या सूचना आ. कुणाल पाटील यांनी महसूल विभागाला दिल्या असून नुकसानीचा अहवाल तातडीने शासनाला सादर करावा. नुकसानग्रस्त शेतकरी व घरांची पडझड झालेल्या कुटूंबाला नुकसान भरपाई मिळावी म्हणून सरकारकडे पाठपुरावा करणार आहे. शेतकर्‍यांच्या खांद्याला खांदा लावून मी त्यांच्यासोबत खंबीरपणे उभा असून शेतकर्‍यांनी नुकसानीमुळे खचून जावू नये असे आवाहन आ. कुणाल पाटील यांनी केले आहे.

हेही वाचा :

The post धुळे : नुकसानीचे पंचनामे करुन सरसकट मदत द्या, तालुका काँग्रेसची मागणी appeared first on पुढारी.