धुळे : पंचायत समितीत भाजपाचे वर्चस्व तर साक्री पंचायत समितीत महाविकास आघाडी यशस्वी

धुळे: पुढारी वृत्तसेवा

धुळे जिल्ह्यातील शिरपूर आणि शिंदखेडा पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक बिनविरोध झाली असून या दोन्ही पंचायत समितीवर भाजपाने आपले निर्विवाद बहुमत सिद्ध केले आहे. तर धुळे पंचायत समितीमध्ये शिवसेनेत फाटाफूट झाली असून शिवसेनेच्या चौघा सदस्यांनी भाजपाला पाठिंबा दिल्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे. साक्री पंचायत समितीत मात्र महाविकास आघाडीने आपली सत्ता अबाधित ठेवली आहे.

धुळे जिल्ह्यातील चार पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी आज निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यानुसार या पंचायत समितीमध्ये विशेष सभेचे आयोजन करण्यात आले. धुळे पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पार्टीचे 16 सदस्य असून महाविकास आघाडीचे 14 सदस्य आहेत .यात शिवसेनेचे पाच सदस्य आहेत. तर एक अपक्ष सदस्य असल्याने या निवडणुकीकडे साऱ्यांचेच लक्ष लागून होते. सभापती पदासाठी भारतीय जनता पार्टीच्यावतीने वंदना मोरे यांनी तर शिवसेनेच्या वतीने मिनाबाई सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. उपसभापती पदासाठी शिवसेनेचे देवेंद्र माळी आणि महाविकास आघाडीचे योगेश पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. या दोन्ही पदांसाठी झालेल्या मतदान प्रक्रियेत भारतीय जनता पार्टीच्या वंदना मोरे यांना 21 मते मिळाली. तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला अवघी नऊ मते मिळाली. त्यामुळे वंदना मोरे या सभापती पदावर विजयी झाल्या. तर उपसभापती पदासाठी देवेंद्र माळी यांना देखील 21 मते मिळाली असून महाविकास आघाडीचे योगेश पवार यांना नऊ मते मिळाली आहे. या निवड प्रक्रिये दरम्यान शिवसेनेच्या चार सदस्यांनी उघडपणे भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला असून एका अपक्ष उमेदवाराची देखील त्यांना साथ लाभली आहे. दरम्यान उपसभापती पदावर देवेंद्र माळी हे भारतीय जनता पार्टीच्या मदतीने विजयी झाले असल्याने त्यांचा बाळासाहेबांची शिवसेना या गटाशी संबंध असल्याचा दावा केला जात आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने देखील त्या आपल्याच गटाच्या असल्याचा दावा केला आहे.

साक्रीत महाविकास आघाडी

साक्री पंचायत समितीत महाविकास आघाडीची सत्ता आहे. त्यामुळे या पंचायत समितीकडे देखील जिल्ह्याचे लक्ष लागून होते. सभापती पदासाठी काँग्रेसच्या शांताराम कुवर तर उपसभापती पदासाठी शिवसेनेच्या माधुरी देसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यात झालेल्या मतदान प्रक्रियेत काँग्रेसच्या शांताराम कुवर यांना 21 तर विरोधी गटाच्या उमेदवारास अवघी 13 मते मिळाली. उपसभापती पदासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या माधुरी देसले यांना देखील 21 मते मिळाली. त्यामुळे या दोन्ही उमेदवारांचा विजय झाला. दरम्यान शिवसेनेच्या उपसभापती माधुरी देसले यांचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, सहसंपर्कप्रमुख महेश मिस्त्री, माजी आमदार शरद पाटील तसेच भरत मोरे आदींनी सत्कार केला आहे.

शिरपूरला आ.अमरीशभाई पटेल यांचे वर्चस्व 

शिरपूर पंचायत समिती सभापतीपदी लताबाई वसंत पावरा (दुर्बड्या) व उपसभापतीपदी विजय संतोष बागुल (थाळनेर) यांची बिनविरोध निवड झाली.

माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांनी आज जनक व्हीला निवास स्थानी सर्व पंचायत समिती सदस्यांची बैठक घेतली.यात माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांनी शिरपूर पंचायत समिती सभापतीपदी लताबाई वसंत पावरा (दुर्बड्या गण ) व उपसभापतीपदी विजय संतोष बागुल (थाळनेर गण ) यांची निवड जाहिर केली. यावेळी तालुक्याचे आमदार काशिराम पावरा, धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, स्वीय सहाय्यक अशोक कलाल, माजी सभापती सत्तारसिंग पावरा, माजी उपसभापती धनश्री बोरसे, सर्व सदस्य उपस्थित होते.त्यानंतर पीठासीन अधिकारी तहसीलदार आबा महाजन यांच्या कडे सभापती पदासाठी लताबाई वसंत पावरा व उपसभापती पदासाठी विजय संतोष बागुल यांचे एकमेव उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी सहाय्यक पीठासीन अधिकारी गटविकास अधिकारी एस. टी. सोनवणे उपस्थित होते. त्यानंतर छाननी होऊन दोन्ही नवनिर्वाचित पदाधिकारी यांची निवड जाहिर करण्यात आली.

 

शिरपुर आ पटेल www.pudhari.news
धुळे : शिरपुर आ. पटेल यांच्यासह उपस्थित विजयी सभापती लताबाई पावरा व उपसभापती विजय बागुल. (छाया: यशवंत हरणे)

शिंदखेडा मध्ये बिनविरोध

शिंदखेडा पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पार्टीचे निर्विवाद बहुमत असल्यामुळे ही पंचायत समिती भारतीय जनता पार्टीकडेच राहील हे निश्चित होते. मात्र सभापती आणि उपसभापती पदासाठी अनेक जण इच्छुक असल्याने कोणाला संधी मिळते. याबाबत कमालीचे उत्सुकता होती. दरम्यान आमदार जयकुमार रावल यांनी सर्व सदस्यांबरोबर घेतलेल्या बैठकीत दोन नावावर शिक्कामोर्तब केले. यात सभापती पदासाठी दाऊळ गणातील वंदनाबाई ईशी तर उपसभापती पदासाठी मेथी गणातील रणजीतसिंग गिरासे यांना संधी देण्याचे निश्चित झाले. त्यानुसार या दोघांनी या उमेदवारी अर्ज दाखल केले विरोधी गटाकडून एकही अर्ज दाखल झाला नाही त्यामुळे सभापती आणि उपसभापती पदावर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आले.

हेही वाचा:

The post धुळे : पंचायत समितीत भाजपाचे वर्चस्व तर साक्री पंचायत समितीत महाविकास आघाडी यशस्वी appeared first on पुढारी.