धुळे : परताव्याचे आमिष दाखवून हजारो ठेवीदारांची एक कोटी 40 लाख 50 हजार रुपयाची फसवणूक

पैशाचे आमिष www.pudhari.news

धुळे: पुढारी वृत्तसेवा

कंपनीत पैसे गुंतवल्यास आकर्षक परतावा देण्याचे अमिष दाखवून धुळे नंदुरबारसह जळगाव जिल्ह्यातील हजारो ठेवीदारांना करोडो रुपयाचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या संदर्भात दोंडाईचा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका गुन्ह्यात एक कोटी 40 लाख 50 हजार 508 रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार प्राथमिक तपासात उघडकीस आला आहे. फसवणूकीचे हे प्रकरण आणखी वाढण्याची शक्यता पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील यांनी व्यक्त केली आहे.

दोंडाईचा गावामध्ये रवींद्र निंबा नेरकर यांच्या वाहनाचे सुटे भाग विक्री करण्याचे दुकान असून याच जागेवर गॅरेज देखील आहे. या भागात 2019 च्या सुमारास कंपनीत पैसे गुंतवल्यास अधिकचा परतावा देण्याची स्कीम सुरु असल्याची माहिती नेरकर यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी माहिती घेऊन गुजरात राज्यातील सुरत येथे राहणारे प्रदीप शुक्ला उर्फ मुन्ना, धनंजय बराड,  देवेश सुरेंद्र तिवारी आणि संदीप कुमार मनुभाई पटेल हे चौघे शुकुल वेल्थ ॲडव्हायझरी आणि शुकुल वेल्थ क्रिएटर मनी फाउंडर डेलिगेट या फर्मच्या माध्यमातून हा व्यवसाय करीत असल्याची माहिती मिळाली. फर्मच्या माध्यमातून सिने चित्रीकरणाच्या कामात पैसे गुंतवले जात असल्याचे आमिष नेरकर यांना दाखवण्यात आले. कंपनीमध्ये पैसे गुंतवल्यास त्यांना जास्तीचा परतावा देण्यात येईल असे आमिष दाखवण्यात आले. त्यानंतर दोंडाईचा येथे जयहिंद कॉलनीत राहणारे मंगेश नारायण पाटील आणि आकाश मंगेश पाटील या दोघा बापलेकांच्या माध्यमातून कंपनीची जाहिरात करण्यात आली. गुंतवणुकीवर आठ ते नऊ टक्के दराने आकर्षक परतावे मिळवण्याचे आमिष दाखवल्याने अनेकांनी कंपनीमध्ये पैसे गुंतवण्यास सुरुवात केली. या सर्व सहा जणांनी गुंतवणुकीची रक्कम स्वीकारली. मात्र सांगितल्यानुसार गुंतवणुकीवर परतावा मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे नेरकर यांना निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी पैशांचा तगादा लावला असता पैसे मिळणार नसल्याचे निदर्शनास आल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. परिणामी त्यांनी दोंडाईचा पोलीस ठाणे गाठून एक कोटी चाळीस लाख पन्नास हजार पाचशे आठ रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दाखल दिली. त्यानुसार संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास करत असताना त्यातील पैसे गोळा करणारे मंगेश नारायण पाटील आणि आकाश मंगेश पाटील या दोघा बापलेकांना पोलीस पथकाने अटक केली आहे.

हेही वाचा:

The post धुळे : परताव्याचे आमिष दाखवून हजारो ठेवीदारांची एक कोटी 40 लाख 50 हजार रुपयाची फसवणूक appeared first on पुढारी.