Site icon

धुळे : पर्यटनासाठी गेलेल्या टोळक्याकडून शस्त्राचा साठा जप्त, दहा जणांना अटक

धुळे : पुढारी वृत्तसेवा

पर्यटनासाठी गेलेल्या टोळक्याने मोठा गुन्हा करण्याच्या हेतूने धारदार शस्त्राचा साठा राजस्थान मधून धुळ्याकडे आणत असल्याचा प्रकार शिरपूर तालुक्यातील सांगवी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांच्या पथकाने हाणून पाडला आहे. या कारवाईत तब्बल 12 तलवारी, दोन गुप्ती, एक चॉपर आणि एक चाकू असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या तरुणांच्या टोळक्याने हा हत्याराचा साठा मोठा गुन्हा करण्याचे हेतूने बाळगला असल्याचा संशय असून त्या दिशेने तपास सुरू असून या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी सांगवी पोलिसांचे बक्षीस देऊन कौतुक केले आहे.

मध्य प्रदेशातून येणाऱ्या एका कारमध्ये मोठा शस्त्रसाठा असल्याची माहिती सांगवी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी हाडाखेड येथील तपासणी नाक्यावर सापळा लावला. यावेळी एम एच 04 एफ झेड 2004 क्रमांकाची ईरटीका कार संशयितपणे इंदोर कडून धुळ्याकडे येत असताना आढळली. ही गाडी थांबवून तपासणी केली असता या गाडीत दहा जण असल्याचे आढळून आले. गाडीची झडती घेतली असता त्यातून 12 तलवारी, दोन गुप्ती, एक चॉपर, एक चाकू, दोन फायटर असा हत्याराचा साठा आढळून आला. त्यामुळे सतपाल गिरधर सोनवणे, किरण नंदलाल दुधेकर, विकास देवा ठाकरे, सखाराम रामा पवार, सचिन राजेंद्र सोनवणे, राजू अशोक पवार, विशाल विजय ठाकरे, संतोष नामदेव पाटील, अमोल शांताराम चव्हाण, विठ्ठल हरवा सोनवणे यांना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरील सर्व आरोपी धुळे तालुक्यातील लळींग तसेच अवधान परिसरातील राहणारे असून त्यांना किरण नंदलाल दुधेकर यांनी मध्यप्रदेशातील वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटन करण्यासाठी नेले होते. हे टोळके राजस्थानमध्ये गेले असता तिथून त्यांनी हा हत्याराचा साठा खरेदी केल्याची माहिती प्राथमिक तपासात उघडकीस आली आहे. दरम्यान यातील सचिन सोनवणे यांच्यावर काही दिवसांपूर्वीच गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आता एखादी मोठी घटना करण्यासाठी वापरला जाण्याची शक्यता तपासातून पडताळून पाहिली जात आहे.

हेही वाचा :

The post धुळे : पर्यटनासाठी गेलेल्या टोळक्याकडून शस्त्राचा साठा जप्त, दहा जणांना अटक appeared first on पुढारी.

Exit mobile version