धुळे : पादचारी महिलेची सोन्याची चैन लांबवणाऱ्या दोघांना अटक 

धुळे: पुढारी वृत्तसेवा 
पादचारी महिलेची सोन्याची चैन हिसकावणाऱ्या दोघांना अवघ्या 24 तासात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांनी गजाआड केले आहे. याप्रकरणी सोन्याची चैन विक्री करणारी महिलेसह खरेदी करणाऱ्या सराफाला नोटीस बजावण्यात आली असून त्यांना तपासासाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शोभा नंदकिशोर निकम (रा.देवपूर) या गृहिणी असून सुयोगनगर परिसरातून पायी जात असताना त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या दुचाकीवरील तरुणांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावली. या संदर्भात पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील यांनी सुरू केला. यामध्ये करण उर्फ अक्षय संजय कांबळे याने दीपक भास्कर इंदाईस या साथीदाराच्या मदतीने गुन्हा केल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने कांबळे व इंदाईस यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून एम एच 18 बीयू 50 47 क्रमांकाच्या दुचाकीसह  बावीस हजार चारशे रुपये रोकड आणि भ्रमणध्वनी असा ऐवज जप्त करण्यात आला. चोरी केलेला दागिना सुनिता केदार यांच्याकडून भरत कल्याण जडे या सराफाने विकत घेतल्याची बाब तपासात निदर्शनास आली. त्यामुळे पंचवीस हजार रुपये किंमतीचे सोन्याची चैन जप्त करण्यात आली आहे. या संदर्भात सुनीता केदार व भरत जडे यांना पोलिस ठाण्यात हजर राहण्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आली असून त्यांचा गुन्ह्यातील सहभाग तपासून पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी दिली आहे.

हेही वाचा:

The post धुळे : पादचारी महिलेची सोन्याची चैन लांबवणाऱ्या दोघांना अटक  appeared first on पुढारी.