धुळे: पिस्तूल, धारदार शस्त्राचा धाक दाखवून २५ लाखांचा ऐवज लुटला

Robbery

धुळे, पुढारी वृत्तसेवा: धुळे शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागील बाजूस असलेल्या घरात आज (दि.२१) पहाटेच्या सुमारास दरोडा पडला. पाच दरोडेखोरांनी पिस्तूल आणि धारदार शस्त्राचा धाक दाखवून २० ते २५ लाखांचा ऐवज लुटला. दरोडेखोरांनी भसीन (पंजाबी) आणि त्यांच्या नातीला मारहाण करून दहशत निर्माण केली. (Dhule Robbery)

याबाबत अधिक माहिती अशी की, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागील बाजूस विनोद भसीन (पंजाबी )यांच्या मालकीची लाकडाची वखार आहे. याच वखारीच्या एका भागात भसीन आणि त्यांचे भाऊ राहतात. आज पहाटे विनोद भसिन यांच्या घराच्या मागील बाजूचा दरवाजा तोडून अज्ञात पाच दरोडेखोर घराच शिरले. या दरोडेखोरांनी थेट विनोद भसीन यांच्या बेडरूममध्ये प्रवेश केला. काही कळण्याच्या आतच भसिन यांच्या डोक्याला पिस्तूल लावून त्यांना धारदार शस्त्राचा धाक दाखवण्यात आला. या गडबडीने झोपलेली त्यांची नात उठली. या मुलीला देखील दरोडेखोरांनी मारहाण केली. या दहशतीमुळे भसीन पुरते हादरले. (Dhule Robbery)

दरोडेखोरांनी पैसे आणि दागिने ठेवल्याची माहिती घेऊन कपाटातील दागिने आणि रोकड काढून घेतली. या दरम्यान भसीन यांचा मुलगा आणि सून शेजारी वेगळ्या खोलीत झोपलेले असल्यामुळे दरोडेखोरांनी त्या खोलीचे दार वाजवून त्यांना देखील उठवले. यानंतर भसीन परिवाराला एकाच खोलीत कोंडले. तत्पूर्वी त्यांचे भ्रमणध्वनी सोबत घेऊन भ्रमणध्वनी वेगळ्या खोलीमध्ये ठेवून पोबारा केला. काही वेळानंतर दरोडेखोर गेल्याची खात्री झाल्याने भसिन परिवार यांनी पोलिसांशी संपर्क केला.

पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील, आझाद नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. यावेळी श्वान पथकाच्या माध्यमातून दरोडेखोरांचा माग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. श्वानाने बडगुजर कॉलनी मधील नाल्यापर्यंतचा माग काढला. यावरून चोरटे आले, त्याच मार्गाने पसार झाल्याचा अंदाज आहे. पोलीस पथकाने परिसरात प्राथमिक तपास सुरू केला. यावेळी त्यांना एक सोन्याचे नाणे आढळून आले आहे .दरोडेखोरांनी लहान मुलीच्या शाळेच्या बॅगेतून चोरीचा ऐवज नेला. यातून हे नाणे पडले असावे, असा देखील अंदाज आहे.

दरम्यान, भसिन यांच्या निवासस्थानाच्या समोरच्या बाजूला सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. घराची मागील बाजू सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत नसल्याची बाब तपासात उघड झाली. अज्ञात दरोडेखोरांनी चोरी करण्यापूर्वी ही बाब रेकी करून पाहिली असावी, असा देखील पोलिसांचा प्राथमिक तपासात अंदाज आहे. आझाद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागासह आझाद नगर पोलिसांचे पथक चोरट्यांच्या माग काढण्याचा प्रयत्न करीत आहेत.

हेही वाचा 

The post धुळे: पिस्तूल, धारदार शस्त्राचा धाक दाखवून २५ लाखांचा ऐवज लुटला appeared first on पुढारी.