धुळे : बुराई नदीवरील पुलाला तडे, वाहतूक बंद

बुराई नदीवरील पुलाला तडे

धुळे(पिंपळनेर)पुढारी वृत्तसेवा

साक्री तालुक्यातील दुसाणे येथील बुराई नदीवरील पुलाच्या पिलरला मोठे तडे गेले आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलावरील वाहतूक तत्काळ बंद केली आहे. पुलालगतच नदीपात्रातून पर्यायी मार्ग सुरू करण्यात आला आहे.

साक्री-दोंडाईचा रस्त्यावर दुसाणे गावालगत बुराई नदी आहे. या नदीवर 1981 मध्ये उंच फुलाचे बांधकाम करण्यात आले. आज या पुलाला जवळपास 43 वर्ष पूर्ण झाल्याने या पुलाच्या काही ठिकाणी तडे गेले आहेत. त्यामुळे काही अपघात घडू नये, म्हणून सावधानता म्हणून, सध्या वाहतूक बंद ठेवली आहे.

या पुलाच्या पिलरला मोठे तडे गेल्याची बाब गावातील काही नागरिकांना लक्षात येताच, त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या धुळे कार्यालयात संपर्क साधला. त्यानंतर अधीक्षक अभियंता विवेक नवले, उपविभागीय अभियंता विनोद वाघ, तसेच कार्यकारी अभियंता आर.आर. पाटील यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. त्यानंतर पुलाची परिस्थिती पाहून लगेच वाहतूक बंद केली.

पूलावरील वाहतूक बंद केल्यामुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर दुरुस्तीचे काम पूर्ण करून वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

उपविभागीय अभियंता विनोद वाघ म्हणाले, “या पुलाच्या पिलरला मोठे तडे गेले आहेत. त्यामुळे काही अपघात घडू नये, म्हणून सावधानता म्हणून, सध्या वाहतूक बंद ठेवली आहे. येत्या 5 ते 6 दिवसात दुरुस्तीचे काम पूर्ण करून, वाहतुकीसाठी पूल सुरळीत केला जाईल.”

हेही वाचा :

The post धुळे : बुराई नदीवरील पुलाला तडे, वाहतूक बंद appeared first on पुढारी.