Site icon

धुळे : बोराडी गावातील बनावट मद्य कारखान्यावर शिरपूर तालुका पोलिसांचा छापा

धुळे  : पुढारी वृत्तसेवा

शिरपूर तालुक्यातील बोराडी गावातील बेघर वस्तीमध्ये बनावट मद्य तयार करण्याचा कारखाना शिरपूर तालुका पोलिसांनी उध्वस्त केला आहे. या प्रकरणात एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या बनावट कारखान्याच्या मुख्य सूत्रधार याला शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका हा मध्य प्रदेशाच्या सीमेलगत असल्याने या तालुक्यातील बऱ्याच गावांमध्ये बनावट मद्य तयार करण्याचे कारखाने यापूर्वी उघडकीस आले आहेत. त्यावर राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस प्रशासनाने कारवाया देखील केल्या आहेत. मात्र या कारखान्यांचे पूर्णपणे निर्मूलन करण्यात अद्यापही दोनही विभागांना पूर्णपणे यश आलेले नाही. दरम्यान बोराडी गावातील बेघर वस्तीत राजरोसपणे बनावट मद्याची निर्मिती होत असल्याच्या तक्रारी झाल्याने शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेश शिरसाठ यांनी कारवाई केली.

या पथकाने छापा टाकला असता संशयितांनी घटनास्थळावरून पलायन केल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान एका घरातील स्वयंपाक खोलीत बनावट मद्य तयार करण्याचे साहित्य आढळून आले. यात एक लाख 34 हजार चारशे रुपये किमतीचे देशी दारूचे लेबल लावलेल्या 1 लाख 920 काचेच्या बाटल्या तसेच दहा हजार रुपये किमतीचे मद्य बनवण्याचे मशीन, 7000 रुपये किमतीचे 70 लिटर स्पिरिट, पाचशे रुपये किमतीचे अल्कोहोल मीटर या सह अन्य साहित्य आढळून आले आहे. या प्रकरणात कॉन्स्टेबल जाकीरउद्दीन शेख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संशयित राजेश विश्वास पावरा याच्या विरोधात भादवि कलम 328 ,468, 486 ,488 ,420, महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आता या बनावट मद्य कारखाना चालवणारा मुख्य सूत्रधाराला शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.

हेही वाचा :

The post धुळे : बोराडी गावातील बनावट मद्य कारखान्यावर शिरपूर तालुका पोलिसांचा छापा appeared first on पुढारी.

Exit mobile version