धुळे मनपा हद्दीतील 11 गावांचे प्रश्‍न केव्हा सोडणार? आमदार कुणाल पाटील यांनी विधानसभेत उठविला आवाज

आमदार कुणाल पाटील www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा 

धुळे महानगरपालिकेत समाविष्ट होवून 11 गावांना 6 वर्ष झाली. एका तपानंतरही ही 11 गावे  विकास कामे आणि मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. त्यामुळे मनपा हद्दीतील या अकारा गावांतील प्रश्‍न केव्हा सोडविणार? असा खडा सवाल आमदार कुणाल पाटील यांनी विधीमंडळात विचारला. आमदार पाटील यांनी विचारलेल्या प्रश्‍नांमुळे वाढीव मालमत्ता कर, विकासाची कामे, सोयी सुविधा, कॉलनी परीसरातील रस्ते आणि कर्मचारी भरतीचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

महाराष्ट्र विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरु आहे. अधिवेशनाचा दुसरा आठवडा असून आ. कुणाल पाटील यांनी मतदार संघातील विकासाच्या प्रश्‍नांवरी आवाज उठविला आहे. धुळे महानगरपालिकेच्या हद्दीत धुळे तालुक्यातील 11 गावांचा समावेश सन 2018 मध्ये करण्यात आला.  6 वर्ष होवूनही या गावांचा विकास महानगरपालिका करु शकली नाही म्हणून आ.कुणाल पाटील यांनी शासनाला धारेवर धरत अकरा गावांचा विकास केव्हा करणार? असा खडा सवाल विचारला आहे.नगरविकास विभागांतर्गत गावांच्या विकासाचे प्रश्‍न मांडतांना आ.कुणाल पाटील यांनी सांगितले कि, कोणतीही सोयी सुविधा नसतांना या गावात धुळे महानगरपालिकेच्यावतीने मालमत्ता करात प्रचंड वाढ करुन  रहिवाशांना आर्थिक संकटात लोटले आहे.या गावांमध्ये रस्त्यांची दुरावस्था आहे, गटारी नाहीत,पथदिवे नाहीत, आरोग्याच्या सुविधा नाहीत, स्वच्छता नाही. या गावांची सुधारणा होईल अशी अपेक्षा येथील रहिवाशांची होती, मात्र त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. म्हणून संपूर्ण विकास आणि आवश्यक त्या मुलभूत सोयी सुविधा जोपर्यंत दिल्या जात नाही तोपर्यंत वाढीव मालमत्ता कराची आकारणी करण्यात येऊ नये अशी मागणी आ.कुणाल पाटील यांनी यावेळी केली.

तीनशे कोटीच्या प्रस्तावाला मान्यता द्या

विधीमंडळाच्या भाषणात आ.कुणाल पाटील यांनी मागणी केली की, धुळे मनपा हद्दीत समाविष्ट करण्यात आलेल्या 11 गावांच्या विकासासाठी शासनाकडे सुमारे 300 कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या निधीतून विकासाबरोबरच आपल्या समस्या मार्गी लागतील अशी अपेक्षा या गावातील नागरीकांना आहे.म्हणून सरकारने 300 रुपयाच्या प्रस्तावास मान्यता द्यावी. त्यामुळे विकासाचा मार्ग खुला होईल.

कॉलन्यांमध्ये पावसाचे पाणी

आज पावसाळ्यात वलवाडी,भोकर,महिंदळे,मोराणे,अवधान या कॉलनी परिसरातील गावांमधील कॉलन्यात पावसाचे पाणी शिरत आहे. या पाण्यामुळे येथील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. वलवाडी परिसरातील रामकृष्ण नगर, विनोद नगर, माध्य.शिक्षक सोसायटी,मधुमंदार सोसायटी, आधार नगर यांसह विविध कॉलन्यामधील रस्ते प्रचंड प्रमाणात खराब झाले आहे. या ठिकाणी येथील रहिवाशी आपल्या घरापर्यंत मोटारसायकलही घेऊन जाऊ शकत नाही. या भागात तुंबणारे पावसाचे पाणी व सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी व्यवस्था करावी, म्हणून अशा भागात रस्ते व गटारींच्या कामासाठी निधीची तरतूद करावी अशी मागणी आ.कुणाल पाटील यांनी विधानभवनात केली.

कर्मचार्‍यांचा अभाव

महानगरपालिकेकडे पुरेसे मनुष्यबळ व कर्मचारी असले तर जनतेचा आवश्यक आणि वेळेवर सेवा देता येऊ शकते.मात्र धुळे महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता,शाखा अभियंता, पर्यावरण  संवर्धन अधिकारी,स्वच्छता निरीक्षक,वाहन चालक,शिपाई यासह अन्य पदे रिक्त आहेत.101 जागांना मंजूर असून त्यातील फक्त 34 कर्मचार्‍यांची भरती करण्यात आलेली आहे. म्हणून पुरेशे कर्मचार्‍यांची नियुक्ती करुन तत्काळ सेवा जनेतेला द्याव्यात असे आ.पाटील यांनी अधिवेशनात सांगितले.

अकरा गावातील 40 कर्मचारी

मनपा हद्दीतील 11 गावातील ग्रामपंचायतीत काम करणार्‍या कर्मचार्‍यारांचा महानगरपालिकेत समायोजन करण्यात यावे अशी मागणी केली होती. त्यातील 40 कर्मचार्‍यांचे आजही समायोजन झाले नाही. या कर्मचार्‍यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन दिले होते. यावेळी त्यांना आश्‍वासन देण्यात आले होते. मात्र अद्यापाही त्यांचे समायोजन झाले नाही म्हणून या 40 कर्मचार्‍यांचा महानगरपालिकेच्या अस्थापनेवर समायोजन करावे अशीही मागणी आ.कुणाल पाटील यांनी अधिवेशनात केली आहे.

आ.कुणाल पाटील यांनी धुळे मनपा हद्दीतील अकरा गावांचे मालमत्ता कर वाढीसह विविध विकासाचे प्रश्‍न मांडून विकास कामांसाठी निधीची मागणी केली. त्यामुळे येथील रहिवाशांना दिलासा मिळाला आहे

हेही वाचा :

The post धुळे मनपा हद्दीतील 11 गावांचे प्रश्‍न केव्हा सोडणार? आमदार कुणाल पाटील यांनी विधानसभेत उठविला आवाज appeared first on पुढारी.