धुळे महासभेत पुन्हा पाणीटंचाईचा प्रश्न पेटला

धुळे महानगरपालिका www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

शहरात प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा असूनदेखील जनतेला पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. या प्रश्नावरून सत्ताधारी भाजपसह विरोधी गटाच्या नगरसेवकांनी महासभेत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. या सर्व अनियमित कामाचे खापर महानगरपालिका प्रशासनावर फोडून पाणीप्रश्न पेटला.

धुळे महापालिकेची महासभा सोमवारी (दि. 31) महापौर प्रदीप कर्पे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी आयुक्त देवीदास टेकाळे, अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, उपआयुक्त विजय सनेर, नगरसचिव मनोज वाघ तसेच विरोधी पक्षनेते कमलेश देवरे, सभागृहनेते राजेश पवार, स्थायी समिती सभापती शीतलकुमार नवले यांच्यासह नगरसेवकांची उपस्थिती होती. सभा सुरू होताच भाजपचे नगरसेवक तथा माजी उपमहापौर भगवान गवळी यांनी बोलण्याची परवानगी मागितली. मात्र, त्यांना डावलत महापौर कर्पे यांनी विरोधी पक्षनेते देवरे यांना बोलण्याची संधी दिल्यामुळे गवळी संतप्त झाले. प्रभागामधील समस्या सभागृहात सांगण्यासाठीही अटकाव केला जातो. यावरून त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या सत्ताधारी गटाला तसेच प्रशासनाला घरचा आहेर देऊन सभात्याग केला. यावेळी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न अनेक नगरसेवकांनी केला. दरम्यान यावेळी सत्ताधारी तसेच विरोधी गटाच्या नगरसेवकांनी पाणी प्रश्नावरून प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. शहरात असणाऱ्या प्रकल्पांमध्ये यावर्षी पुरेसा पाणीसाठा असूनही जनतेला 10 ते 15 दिवस पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. नगरसेवक अमोल मासोळे यांनी प्रशासनावर खापर फोडत असताना, प्रशासन भारतीय जनता पक्षाची नकारात्मक प्रतिमा तयार करत असल्याचा आरोप केला. महापालिका प्रशासन कोणतेही काम वेळेवर करीत नसल्याचा आरोपदेखील यावेळी करण्यात आला.

हेही वाचा:

The post धुळे महासभेत पुन्हा पाणीटंचाईचा प्रश्न पेटला appeared first on पुढारी.