
धुळे; पुढारी वृत्तसेवा : धुळे तालुक्यातील ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा आमदार कुणाल पाटील यांचा झंझावात कायम राहिला असून त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने आपले वर्चस्व पुन्हा एकदा प्रस्थापित केले आहे. सर्वाधिक ग्रामपंचायतींवर काँग्रेस, महाविकास आघाडीने आपला झेंडा फडकविला आहे. दरम्यान तालुक्यात लक्षवेधी ठरलेल्या मुकटी,देऊर बु., मांडळ,नंदाणे, रतनपूरा,धनुर यासह २५ ग्रामपंचायतीवर काँग्रेसने आपला झेंडा फडकविला आहे.
विजयी उमेदवारांनी आमदार कुणाल पाटील यांच्या संपर्क कार्यालयाजवळ गुलाल, ढोल ताशे व फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष करण्यात आला. यावेळी माजी मंत्री रोहिदास पाटील यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. सरपंच पदाच्या उमेदवारांसह सर्वाधिक ग्रामपंचायत सदस्यही काँग्रेस पक्षाचेच विजयी झाले आहेत.
धुळे तालुक्यातील ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर करण्यात आले. धुळे तालुका नेहमीच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुक्यातील ग्रामपंचायतींवर आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीची सत्ता आहे. आणि पुन्हा एकदा आमदार पाटील यांनी मुसंडी मारत वर्चस्व कायम राखले आहे. एकूण २५ ग्रामपंचायतीवर काँग्रेस महाविकास आघाडीने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
सरपंचांसह सर्वाधिक ग्रामपंचायत सदस्यही काँग्रेस पक्षाचे विजयी झाले आहेत. दरम्यान धुळे तालुक्यात लक्षवेधी ठरलेल्या मुकटी, देऊर,धनुर, मांडळ,रावेर,नंदाणे,रतनपूरा,वार, कुळथेसह २५ ग्रामपंच्यातींवर काँग्रेसने झेंडा फडकविला असून फागणे ग्रामपंचायतीच्या काँग्रेस उमेदवाराचा फक्त 84 मतांनी निसटता पराभव झाला. मात्र तेथे १४ ग्रामपंचायत सदस्य काँग्रेस महाविकास आघाडीचे विजयी झाले आहेत. तसेच तिखी ग्रामपंचायतीतही ७ ग्रामपंचायत सदस्य काँग्रेसचे निवडून आले आहेत. त्यामुळे फागणे व तिखी ग्रामपंचायतीवरही काँग्रेसने बहुमत मिळविले आहे.
काँग्रेस वर्चस्वाच्या ग्रामपंचायती
आमदार कुणाल पाटील यांच्या वर्चस्वाखाली काँग्रेस महाविकास आघाडीने २५ ग्रामपंचायतींवर आपली सत्ता स्थापन केली. या ग्रामपंचायतींवर काँग्रेसचे सरपंच निवडून आले आहेत. त्यात १) मेहेरगाव-विवेक भामरे राष्ट्रवादी/काँग्रेस (महाविकास) बिनविरोध,२) नावरा-रतन धोंडू बागुल(महाविकास आघाडी (बिनविरोध),३) विश्वनाथ-सुकवड- विजया गुलबराव पाटील(बिनविरोध),४) मांडळ- नयना संदीप पाटील (बिनविरोध),५)चांदे-अनिता वाल्मिक ठाकरे(बिनविरोध), ६)आर्णी -निलेश हिम्मत माळी,७)भदाणे-भिमराव ढबू मारनर(काँग्रेस पुरस्कृत),८)देऊर बु. भाऊसाहेब गुलाब देवरे(महाविकास आघाडी),९)हडसुणे-काँग्रेस–जानकाबाई हरी पगारे,१०)तामसवाडी-हेंकळवाडी- कांतीलाल पाटील,११) होरपाडा – महाविकास आघाडी – रंभाबाई आण्णा खुरणे,१२) कुळथे-गंगुबाई सुकराम सोनवणे,१३)कुंडाणे(वार)–गवरलाल गोपीचंद पाटील,१४)नंदाणे- रविंद्र निंबा पाटील,१५)न्याहळोद-कविता प्रकाश वाघ(महाविकास आघाडी),१६)रावेर-दिपाली साहेबराव देवरे,१७)सैताळे-गिरधर पोलाद पाटील,१८)सिताणे-रंजनकोरबाई दौलतसिंग राजपूत,१९)वार-महाविकास आघाडी- दिलीप काशिनाथ पाटील,२०)उभंड-सुरेखा नंदकिशोर जाधव,२१)रतनपूरा– दगडू दौलत माळी,२२)धनुर- चेतन कैलास शिंदे,२३)कौठळ-सरला किर्तीमंत कौठळकर,२४)मुकटी-मंगलबाई प्रभाकर पारधी २५)नंदाळे खु.-स्वाती सतिष देसले हे उमेदवार आ. कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली सरपंचपदी निवडून आले आहेत.
बिनविरोध ग्रामपंचायती काँग्रेस महाविकासच्या ताब्यात
दरम्यान माघारीअंती बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतीही आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या ताब्यात आल्या आहेत. त्यात विश्वनाथ सुकवड, मांडळ,चांदे या ग्रामपंचायतीवर काँग्रेस बिनविरोध निवडून आली आहे, तर मेहरगाव ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस(महाविकास आघाडी) आणि नावरा ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे.
मतदारांची विकासाला साथ : आमदार कुणाल पाटील
धुळे तालुका हा कायमच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. याआधीही तालुक्यातील ग्रामपंचायतींवर काँग्रेसचेच वर्चस्व राहिले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या या टप्प्यामध्ये एकूण 33 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत्या. त्यामध्ये चार ग्रामपंचायतींवर काँग्रेस महाविकास आघाडीने बिनविरोध वर्चस्व मिळवले होते. त्यानंतर आज झालेल्या निकालात एकूण २५ ग्रामपंचायतींवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. त्यात २३ ग्रामपंचायती काँग्रेसच्या ताब्यात आल्या असून दोन ग्रामपंचायती आमचे मित्र पक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेसने ताब्यात घेतली आहेत. त्यामुळे या निकालावरून पुन्हा धुळे तालुका हा काँग्रेसचा अभेद्य बालेकिल्ला आहे हे या निकालातून मतदार बंधू-भगिनींनी विरोधकांना दाखवून दिले.
खरंतर हा कौल विकासाला दिला असून आमचे कार्यकर्ते गावागावात जाऊन वैयक्तिकरित्या लोकांच्या समस्या सोडवत असतात. त्यामुळेच जनतेने विकासाला साथ दिली आहे. यापुढेही काँग्रेस असो अथवा विरोधी पक्षाच्या ग्रामपंचायती असो प्रत्येक गावात विकासाची समान कामे करून धुळे तालुक्यात विकास कामांना गती दिली जाईल. धुळे तालुक्यातील मतदारांनी पुन्हा एकदा काँग्रेस पक्षावर विश्वास दाखवून मतदान केले त्याबद्दल सर्व मतदार बंधू भगिनींचे मनःपूर्वक आभार आणि निवडून आलेल्या सर्वच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करतो अशी प्रतिक्रिया आ. कुणाल पाटील यांनी दिली आहे.
हेही वाचा;
- MP Politics : शिवराज सिंह चौहान सरकार विरोधातील अविश्वास प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी स्विकारला
- रायगड : अलिबाग ग्रामपंचायत निवडणुकीत ‘शेकाप’ला धक्का; शिंदे गटाचे वर्चस्व
The post धुळे : मुकटी, देऊर, धनुर, मांडळ, रतनपूरा ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा झेंडा appeared first on पुढारी.