धुळे : मुलींची छेड काढल्याचा जाब विचारणाऱ्या बाप-लेकावर हल्ला, एकाचा मृत्यू

मारहाण

धुळे : पुढारी वृत्तसेवा.

मुलींची छेड काढल्याचा जाब विचारणाऱ्या बाप लेकावर जमावाने हल्ला करून त्यांना बेदम मारहाण केल्याची घटना साक्री तालुक्यातील निजामपूर गावात घडली आहे. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या एकाचा मृत्यू झाला असून दुसरा युवक नंदुरबारच्या रुग्णालयात अत्यवस्थ अवस्थेत उपचार घेत आहे. दरम्यान आरोपी अटक केल्याशिवाय मृतदेह नेणार नसल्याची भूमिका संबंधितांनी घेतल्यामुळे पोलीस पथकाने पहाटेपर्यंत पाच आरोपींना बेड्या ठोकल्या आहे. दरम्यान गावात शांततेचे वातावरण असुन नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये,असे आवाहन पोलीस अधिक्षक प्रविणकुमार पाोटील यांनी केले आहे.

निजामपूर येथे राहणाऱ्या अलविरा अल्ताफ शेख व सोनू मुस्ताक मणियार या दोन्ही मुली किराणा दुकानाकडे जात असताना गावातील सागर आणि मगन या दोघा मुलांनी त्यांचे हात पकडून त्यांचा छेड काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी असरार मुनाफ मणियार यांनी या दोघा मुलांना छेड काढू नका असे सांगून हटकले. तसेच यावेळी सागर आणि मगन यांनी असरार याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. सागर याच्या हातात असलेल्या फळीला खिळे ठोकलेले असल्याने असरार मनयार याला गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या. दरम्यान अस्रार याचे वडील मुनाफ गफ्फार मण्यार हे देखील भांडण सोडवण्यासाठी गेले असता त्यांना घटनास्थळावर असणाऱ्या अनिल ,सतीश ,शुभम ,गोल्या आणि राकेश यांनी मारहाण करण्यास मदत केली. सागर खैरनार यांनी हातातील फळीने मुनाफ यांना डोक्याच्या मागील बाजूस गंभीर स्वरूपाने मारहाण केली. त्यामुळे मुनाफ जमिनीवर कोसळले तसेच असरार देखील गंभीर जखमी होऊन जमिनीवर पडला होता. त्याच्या नाकातून रक्त निघत असल्याने त्याला शाहरुख शेख अखिल शेख याने मोटरसायकलीवर बसवून जैताने येथील ग्रामीण रुग्णालयात नेत असताना असरार याने निजामपूर पोलीस ठाण्यात तक्रार द्यायची असल्याचे सांगून पोलीस ठाण्याकडे नेण्यास सांगितले. त्यावरून पोलीस ठाण्यात नेले असता पोलिसांनी उपचारासाठी मेमो दिला. या दरम्यान उपचारासाठी त्याला आणले असता त्याला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नंदुरबार येथे रुग्णवाहिकेने येण्यास सांगितले. यावेळी शाहरुख शेख यांना भ्रमणध्वनीवरून मोमीन खान हुसेन खान यांनी संपर्क करून मुनाफ गफार मण्यार हे गंभीर जखमी झाले असल्याचे सांगितले. तसेच त्यांच्या डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली.

या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. मुनाफ मन्यार यांच्या नातेवाईकांनी त्यांचा मृतदेह निजामपूर पोलीस ठाण्याच्या आवारात आणून ठेवला. आरोपींना अटक केल्याशिवाय पुढील कार्यवाही करणार नसल्याची भूमिका घेतल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान ही माहिती कळल्याने अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील हे अतिरिक्त पोलीस पथकांसह निजामपूर गावात पोहोचले. त्यांनी नातेवाईकांची समजूत घालण्याचा प्रयत्न सुरू केला. या दरम्यान पोलीस पथकाने तातडीने हालचाली करीत पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे. आरोपींचे अटक सत्र सुरू झाल्यामुळे नातेवाईकांचा रोष कमी झाला. यादरम्यान रात्री सात जणांच्या विरोधात वेगवेगळ्या कलमान्वये निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

The post धुळे : मुलींची छेड काढल्याचा जाब विचारणाऱ्या बाप-लेकावर हल्ला, एकाचा मृत्यू appeared first on पुढारी.