धुळे : म्हणून… 247 वाहनधारकांचे लायसन्स तीन महिन्यासाठी निलंबित

वाहन

धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळे शहर वाहतुक शाखेकडून 1 एप्रिल 2022 ते 28 फेब्रुवारी 2023 या कालावधीत विना हेल्मेट वाहन चालविणे, मद्य पिऊन वाहन चालविणे, चालत्या वाहनांवर मोबाईल संभाषण करणे, ट्रिपल सिट वाहन चालविणे इत्यादी मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांच्या कृतीमुळे मोठ्या प्रमाणात अपघात घडले आहेत. त्यामुळे जिविताचे व मालमत्तेचे नुकसान झाले आहे. वाहनधारकांनी अशा प्रकारची कृती पुन्हा करु नये याकरीता अशा 247 वाहनधारकांची अनुज्ञप्ती (लायसन्स) तीन महिन्याकरीता निलंबन करण्याचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन कार्यालय यांचेकडे पाठविण्यात आला होता. त्यानुसार प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या एकुण 247 वाहनधारकांच्या लायसन्स तीन महिन्याच्या कालावधीकरीता निलंबीत केल्याबाबत कळविले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिली आहे. तसेच शहरातील वाहनधारकांनी विना हेल्मेट वाहन चालविणे, दारु पिऊन वाहन चालविणे, चालत्या वाहनांवर मोबाईल संभाषण करणे, ट्रिपल सिट वाहन चालविणे इत्यादी मोटर कायद्याचे उल्लंघन होऊन आपल्या व इतरांच्या जिविताचे व मालमत्तेचे नुकसान होणारी याची काळजी घ्यावी. असे आवाहनही त्यांनी केले आहे.

The post धुळे : म्हणून... 247 वाहनधारकांचे लायसन्स तीन महिन्यासाठी निलंबित appeared first on पुढारी.