Site icon

धुळे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापना

धुळे : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासनस्तरावर असलेली कामे, त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने, संदर्भ यामध्ये अधिक लोकाभिमुखता, पारदर्शकता व गतिमानता येण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्यामुळे आता नागरिकांना निवेदने व अर्ज थेट या कक्षात देता येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांच्यासह माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले, कार्यालयातील पहिल्या मजल्यावर मुख्यमंत्री सचिवालय कक्ष सुरू झाला आहे. हा कक्ष कार्यालयीन कामाकाजाच्या वेळेत सुरू राहणार आहे. 22 डिसेंबर 2022 पासून कक्षाचे कामकाज सुरू असून, आतापर्यंत 14 अर्ज कक्षात प्राप्त झाले आहेत. त्यातील 9 अर्जांवर कार्यवाही करण्यात आली असून प्रलंबित 5 अर्जांपैकी एक अर्ज मुख्यमंत्री सचिवालय स्तरावर पाठविण्यात आला आहे. तर इतर अर्जावर कार्यवाही सुरु आहे. ज्या अर्जावर शासनस्तरावर कार्यवाही होणे अपेक्षीत आहे. तसेच काही अर्ज, निवेदन शासनाच्या धोरणात्मक बाबींशी निगडीत असतात अशी निवेदन त्या स्तरावरून मुख्यमंत्री सचिवालय कक्ष (मुंबई), यांच्याकडे पाठविण्यात येतात. मात्र जे जिल्हास्तरावरील किंवा उपविभाग, तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांशी संबंधित अर्ज आहेत ते संबंधित विभागाच्या जिल्ह्याच्या कार्यालय प्रमुखांकडे उचित कार्यवाहीसाठी पाठविण्यात येणार आहे. कार्यवाहीनंतर संबंधित विभाग अर्जदारास केलेल्या कार्यवाहीबाबत अवगत करणार आहे. त्याची प्रत कक्षास पाठविणार आहे.  त्याचप्रमाणे या कक्षासाठी मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायगवाड, नायब तहसिलदार, एक लिपीक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. असेही जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले. नागरिकांनी मुख्यमंत्री सचिवालय व शासनस्तरावर असलेली कामे व त्यासंदर्भातील अर्ज, निवेदन जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सचिवालय कक्षाकडे लेखी स्वरुपात द्यावेत, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी  केले आहे.

हेही वाचा:

The post धुळे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापना appeared first on पुढारी.

Exit mobile version