धुळे: रस्त्याअभावी आदिवासी महिलेच्या प्रसुतीसाठी झोळीचा आधार

dhule

धुळे; पुढारी वृत्तसेवा: धुळे जिल्ह्यातील आदिवासी बहुल असणाऱ्या दुर्गम भागात रस्तेच नसल्यामुळे रुग्णांना दवाखान्यात नेण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. शिरपूर तालुक्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागात असाच प्रकार घडल्याचे निदर्शनास आले. एका आदिवासी महिलेला प्रसुतीसाठी रूग्णालयात नेण्याकरिता बांबुच्या झोळीत टाकून तिच्या नातेवाईकांना सहा किलोमीटरची पायपीट करावी लागली. त्यामुळे जिल्हा परिषदेसह रस्ते काम करणाऱ्या वेगवेगळ्या विभागांचा खरा चेहरा उघड झाला (Dhule News)  आहे.

शिरपूर तालुक्यातील (Dhule News)  गुऱ्हाळपाणी ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या थुवानपाणी येथे रस्त्याची सोय नसल्याने, थुवानपाणी येथील एका महिलेला बांबूंना फडके बांधून त्याची झोळी करुन तीन किलोमीटर अंतरावरील गुऱ्हाळपाणी येथे न्यावे लागले. या महिलेला आता गुऱ्हाळपाणी आरोग्य केंद्रात दाखल केले आहे. शिरपूर तालुक्यात उत्तरेला मध्यप्रदेश सीमेवरील दुर्गम डोंगराळ क्षेत्रात नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. गुऱ्हाळपाणी ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या थुवानपाणी व निशाणपाणी या दुर्गम क्षेत्रात येण्या जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होतात. येथील लालबाई मोतीराम पावरा या महिलेला प्रसूतीकळा होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी नातेवाइकांना तारेवरची कसरत करावी लागली. यावेळी नातेवाइकांनी बांबूची झोळी बनवून त्यात गरोदर महिलेला टाकून निशाणपाणी ते थुवाणपाणी व थुवाणपाणी ते गुऱ्हाळपाणी हे 3 किलोमीटरचे अंतर पायपीट करत आणण्यात आले.

निशाणपाणी ते थुवाणपाणी व थुवाणपाणी ते गुऱ्हाळपाणी डांबरी रस्ता नसल्याने येथे रुग्णवाहिका पोहोचत नसल्याने या महिलेला निशाणपाणी ते थुवाणपाणी 3 किलोमीटर व थुवाणपाणी ते गुऱ्हाळपाणी 3 किलोमीटर असे एकूण 6 किलोमीटरचा रस्ता झोळीत पार करण्यात आला. त्यानंतर तेथून या महिलेला गुऱ्हाळपाणी येथून रुग्णवाहिकेने वकवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. यानंतर या महिलेची सुखरूप प्रसूती करण्यात आली. या महिलेची तसेच बाळाची प्रकृती ही उत्तम असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. याप्रसंगी ग्रा.पं. सदस्य गुलबा पावरा, सिकना पावरा, कावसिंग पावरा, आशा सेविका सुरमीबाई पावरा, सतीलाल पावरा यांनी या महिलेला झोळीने आणण्यास सहकार्य केले.

Dhule News रस्त्याची मागणी जुनीच

धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी यांनी या क्षेत्राला भेट दिली होती. त्यावेळी त्यांना देखील थुवाणपाणी पर्यंत पायी चालत यावे लागले. त्यावेळी ग्रामस्थांनी त्यांना रस्त्याची मागणी केली होती. मात्र, अद्यापही रस्त्याबाबत काही कार्यवाही न झाल्याने नागरिकांची प्रतीक्षा कायमच आहे. या दुर्गम भागात रस्त्याची सुविधा पुरवावी, अशी मागणी होत आहे.

गुऱ्हाळपाणी ग्रुप ग्रामपंचायती अंतर्गत दहा ते बारा खेडे येतात. आम्ही गेल्या कित्येक वर्षांपासून रस्त्याची मागणी करत आहोत. मात्र, याबाबत कोणीही गांभीर्य घेतलेले नाही. या क्षेत्रात रस्त्याची सुविधा पुरविण्यात याव्यात, अशी प्रतिक्रिया माजी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्रसिंग पावरा यांनी दिली आहे.

हेही वाचा 

The post धुळे: रस्त्याअभावी आदिवासी महिलेच्या प्रसुतीसाठी झोळीचा आधार appeared first on पुढारी.