धुळे: राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा महापालिका आयुक्तांना घेराव

Dhule

धुळे, पुढारी वृत्तसेवा: धुळे शहरातील खराब रस्त्यांची दुरूस्ती आणि सुरळीत पाणीपुरवठा करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्त देविदास टेकाळे यांना आज (दि. २५) घेराव घातला. याबाबत महापालिका प्रशासनाने तत्काळ कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले यांनी दिला आहे. यावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धुळे शहरातील संपूर्ण रस्ते खराब झालेले आहेत. पावसाळयामध्ये ठिकठिकाणी खड्डे तयार झाले आहेत. कॉलनी परिसरामध्ये सर्वत्र चिखल झालेला असून नागरिकांना घरापर्यत गाडी घेवून जाता येत नाही. रस्त्यातील खड्डयांमुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी यांना त्रास होत आहे. ठिकठिकाणी अपघाताच्या घटना घडत आहेत. रस्त्यांवर पाणी साचलेले आहे.

त्याचबरोबर भर पावसाळ्यात आठ दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. पाणी टंचाई निर्माण झाली असून दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

धुळे शहरातील खराब रस्ते व कृत्रिम पाणीटंचाईला धुळे महानगरपालिका व सत्ताधारी भाजप जबाबदार आहे. योग्य नियोजन नसल्यामुळे तसेच ढिसाळ कारभारामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या वतीने महापालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा रणजीतराजे भोसले यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

यावेळी जोसेफ मलबारी, राजू डोमाळे, शकीला बक्ष, चेतना मोरे, हिमानी वाघ, तरुणा पाटील, रशमी पवार, नूर शहा, संजय माळी, राजेंद्र सोलंकी, जितू पाटील, वाल्मीक मराठे, भटू पाटील, संजय सरग, बरकत शहा, आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा 

The post धुळे: राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा महापालिका आयुक्तांना घेराव appeared first on पुढारी.