धुळे : लाच स्वीकारल्याने सोनगीरच्या मुख्याध्यापकासह सहशिक्षकाला बेड्या

लाचखोरी

धुळे : पुढारी वृत्तसेवा

कारणे दाखवा नोटीसीवर कारवाई न करण्यासाठी शिक्षकाकडून लाच स्वीकारल्या प्रकरणात मुख्याध्यापकासह सहाय्यक शिक्षकाला धुळ्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणात सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळे तालुक्यातील सोनगीर येथील एन.बी.बागुल हायस्कुलमध्ये तक्रारदार हे सहायक शिक्षक पदावर कार्यरत आहेत. त्यांना शाळेचे मुख्याध्यापक भानुदास हिरामण माळी यांनी कसुरी केल्याच्या कारणास्तव नोटीस दिली होती. त्याबाबत तक्रारदार हे मुख्याध्यापक माळी यांना भेटण्यास गेले असता त्यांनी शाळेतील सहायक शिक्षक हाफीजखान पठाण यांना भेटण्यास सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी सहायक शिक्षक पठाण यांची भेट घेतली असता पठाण यांनी तक्रारदार यांना देण्यात आलेल्या कारणे दाखवा नोटीसवर कारवाई न करण्यासाठी 10 हजारांची मागणी केली. त्यामुळे शिक्षकांने याबाबत धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर व पथकाने तक्रारीची पडताळणी केली.

त्यादरम्यान सहायक शिक्षक पठाण यांनी तक्रारदार यांच्याकडे तडजोडी अंती 5 हजार रुपये लाचेची मागणी केली. लाचेच्या मागणीच्या अनुषंगाने तक्रारदार यांना पडताळणी कामी मुख्याध्यापक भानुदास माळी यांच्याकडे पाठविले असता त्यांनी देखील कारणे दाखवा नोटीसवर कारवाई न करण्यासाठी लाचेची रक्कम सहायक शिक्षक पठाण यांना देण्यास सांगितले. त्यानंतर आज पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे तसेच राजन कदम, शरद काटके, भुषण खलाणेकर, संतोष पावरा, भुषण शेटे, संदीप कदम, रोहीणी पवार, रामदास बारेला, गायत्री पाटील, वनश्री बोरसे, प्रशांत बागुल, प्रविण पाटील, मकरंद पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी सोनगीर येथील पोलीस ठाण्यासमोरील मुंबई-आग्रा महामार्गलगत सापळा लावला.

यावेळी सहायक शिक्षक हाफीजखान पठाण यांनी तक्रारदाराकडून मुख्याध्यापक माळी यांच्या सांगण्यावरुन 5 हजार रुपये लाचेची रक्कम स्विकारतांना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी दोघांविरूध्द सोनगीर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

The post धुळे : लाच स्वीकारल्याने सोनगीरच्या मुख्याध्यापकासह सहशिक्षकाला बेड्या appeared first on पुढारी.