धुळे : लोडशेडिंग संदर्भात पिंपळनेरच्या महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा

पिंपळनेर,www.pudhari.news

पिंपळनेर, ता. साक्री, पुढारी वृत्तसेवा

पिंपळनेर तालुका शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडी यांच्या वतीने विद्युत वितरण कार्यालय पिंपळनेर येथे धडक मोर्चा नेत सतत बंद होणाऱ्या व लोडशेडिंग संदर्भात कनिष्ठ अभियंता आर. आर. रणधीर व सी. सी. ठाकुर यांना निवेदन देत जाब विचारण्यात आला.

गेल्या महिनाभरापासून पावसाने कलाटणी दिलेली असताना, खरीप हंगामातील पिके जळून जाण्याच्या परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा काळात, शेतकरी आपल्या पोटाच्या मुलांप्रमाणे सांभाळलेल्या पिकाला जगाण्यासाठी विहिरी व कुपनलिकेच्या साह्याने पाणी देण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, महावितरण कार्यालयाच्या भोंगळ कारभारामुळे व सतत बंद होणाऱ्या विद्युत प्रवाहामुळे पिकांना पाणी भरणा होत नाही. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. या मुर्दांड सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे शेतकरी पूर्णपणे बेजार झाला आहे.

तरी, विद्युत प्रवाह संबंधित सर्व तक्रारींचे निवारण लवकरात लवकर करून शेतकऱ्यांना आधार द्यावा, अशी विनंतीवजा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. जर येत्या काही दिवसात या परिस्थितीत बदल झाला नाही तर, शिवसेना पिंपळनेर तालुक्याच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल आणि त्यानंतर उद्भवणाऱ्या सर्व परिस्थितीस महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी जबाबदार राहतील असे सांगण्यात आले.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख  हिम्मत साबळे, शिवसेना तालुका समन्वयक ज्ञानेश्वर पगारे, शिवसेना उपतालुका प्रमुख मनोज खैरनार, उपतालुका प्रमुख तुषार गवळी, शिवसेना पिंपळनेर शहरप्रमुख महेश वाघ, शहर समन्वयक उदय बिरारी, विभागप्रमुख जाकीर शेख, शिवसेना उपतालुका प्रमुख वन्यादादा मावची, युवासेना तालुकाप्रमुख रमेश शिंदे, युवासेना उपतालुका प्रमुख चिंतामण ठाकरे, शिवसेना उपशहरप्रमुख बाबा शेख, युवासेना उपशहरप्रमुख मयुर नांद्रे, शाखाप्रमुख स्वप्निल चित्ते, भूपेंद्र बैसाणे, रईस पटेल, दाईस शेख, प्रतीक सोनवणे, कुणाल धोंडगे, सुभाष चौरे, दिलीप सोनवणे, पियुष सोनवणे, शिवसैनिक तथा शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

The post धुळे : लोडशेडिंग संदर्भात पिंपळनेरच्या महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा appeared first on पुढारी.