Site icon

धुळे : विद्युत खांबाला हात लावताच शॉक लागून आठ वर्षीय बालकाचा मृत्यू

धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळ्याच्या गफुर नगर परिसरात विद्युत खांबाला हात लावताच शॉक लागून आठ वर्षीय बालकाच्या दुर्दैवी मृत्यू झाल्याची  घटना घडली आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या परिसरातील नागरिकांनी वीज वितरण कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांवर खूनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तर  आमदार फारुक शहा यांनी घटनास्थळी भेट देऊन तातडीने मयत बालकाच्या परिवाराला मदत देऊन या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

धुळे शहरातील आझाद नगर परिसरात असलेल्या गफूर नगरातील एका घराबाहेर असलेल्या विजेच्या खांबा जवळ काही मुले खेळत होती. मात्र या विजेच्या खांबामध्ये विजेचा प्रवाह उतरला होता. याची माहिती या बालकांना नसल्यामुळे खेळत असलेल्या एका आठ वर्षे मुलाचा हात या खांबाला लागला. त्यामुळे तो खांबाला चिकटला. ही बाब काही मुलांच्या लक्षात आली. त्यांनी आरडाओरडा केला. पण मदत मिळण्यापूर्वीच खांबाला चिकटलेला मुलगा खाली पडला. आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. नागरिकांनी तातडीने हालचाली करून त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले.

अरशद अहमद अशपाक मोमीन( वय आठ वर्ष )असे मृत झालेल्या मुलाचे नाव आहे. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. वीज वितरण विभागाच्या गलथान कारभारामुळेच या बालकाचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करीत स्थानिकांनी व नातेवाईकांनी संबंधित वीज वितरण अधिकाऱ्यावर 302 चा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत संबंधित अधिकाऱ्यास तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी केली आहे.

विशेष म्हणजे परिसरामध्ये नेहमीच वीज वितरण विभागाच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना विविध त्रासांना सामोरे जावे लागत असल्यामुळे, यापूर्वीच बहुतांश वेळा परिसरातील नागरिकांनी वीज वितरण कार्यालयामध्ये निवेदन देऊन समस्या सोडवण्या संदर्भात मागणी केलेली असताना, वीज वितरण विभागातर्फे जाणीवपूर्वक सर्व समस्यांकडे दुर्लक्ष केले जात होते आणि वीज वितरण विभागाच्या याच दुर्लक्षितपणामुळे या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, यास कारणीभूत असलेल्या वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांवर या संदर्भात कठोरात कठोर कारवाई करावी, अन्यथा जनआंदोलन छेडण्याचा इशारा परिसरातील सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर सरफराज अंसारी यांनी दिला. दरम्यान आमदार फारुक शहा यांनी या मयत बालकाच्या परिवाराचे सांत्वन केले असून वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसह घटनास्थळाची पाहणी केली आहे. यात वीज वितरण कंपनीने तातडीने या भागातील खांबांवरील बीज वाहिन्या दुरुस्त कराव्यात, अन्यथा तीव्र स्वरूपाच्या आंदोलन केले जाणार असून संबंधित अधिकारी यांनी कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई सरकारकडे केली जाणार असल्याचा इशारा दिला आहे.

हेही वाचा :

The post धुळे : विद्युत खांबाला हात लावताच शॉक लागून आठ वर्षीय बालकाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Exit mobile version