धुळे : विवाहितेवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला सात वर्षांची सक्तमजुरी

धुळे www.pudhari.news

धुळे, पुढारी वृत्तसेवा : विवाहितेवर बलात्कार करणाऱ्या नराधमास सात वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सत्र न्यायाधीश ए. डी. क्षीरसागर यांनी ठोठावली आहे. धुळे जिल्ह्यातील बुरझड येथील पीडितेवर ३० मे २०१७ रोजी अत्याचार झाला होता. सदर पीडिता ही तिच्या पतीच्या जेवणाचा डबा देण्यासाठी शेतात एकटीच जात असताना तिला आबा रामो भिल याने रस्त्यात अडवून जिवे ठार करण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केला. यावेळी पीडितेने केलेल्या आरडाओरडीमुळे या भागातून जाणाऱ्या एका युवकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे अत्याचार करणारा नराधम पळून गेला.

यानंतर पीडितेने सोनगीर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक एन टी सोनवणे यांनी करून न्यायालयात आरोप पत्र दाखल केले. तर या खटल्याच्या कामकाजात जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह तवर यांनी महत्त्वाचा युक्तिवाद केला. अतिरिक्त सरकारी वकील निलेश कलाल यांनी न्यायालयासमोर घटनास्थळाचे पंच तसेच महत्त्वाचे साक्षीदार न्यायालयात हजर केले.

युक्तिवादात ॲड. तवर यांनी विविध उच्च न्यायालयाचे वेगवेगळे निवाडे सादर केले. त्याचप्रमाणे या आरोपीने केलेले कृत्य हे समाजाला घातक असून त्याला जास्तीत जास्त शिक्षा होणे आवश्यक असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. समाजात या शिक्षामुळे एक संदेश जाणार असल्याने साक्ष आणि पुरावे पाहता पीडितेला देखील न्याय देण्याचे आवाहन यावेळी सरकार पक्षाच्या वतीने ॲड तवर यांनी केले. या सर्व युक्तिवाद आणि साक्ष पुरावे पाहता सत्र न्यायाधीश ए. डी. क्षीरसागर यांनी आरोपीला सात वर्षे सक्त मजुरीची शिक्षा तसेच हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

हेही वाचलंत का?

The post धुळे : विवाहितेवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला सात वर्षांची सक्तमजुरी appeared first on पुढारी.