धुळे : वीस हजारांची लाच स्वीकारणाऱ्या पोलीस नाईकासह पंटरला अटक

लाच मागणारा पोलिस जाळ्यात,www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

जप्त केलेली दुचाकी सोडून देण्यासाठी वीस हजार रुपयाची लाच स्वीकारणाऱ्या सोनगीर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईकासह त्याच्या पंटरला धुळ्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. त्यांच्या विरोधात सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळे येथील रहिवासी असणा-या व्यक्तीने या संदर्भात तक्रार दिली होती. तक्रारदाराच्या भावाचे लग्न असल्यामुळे त्यांनी त्याच्या मित्राकडून (अॅक्टिवा) दुचाकी लग्नपत्रिका वाटण्यासाठी घेतली होती. सुमारे एक महिन्यांपूर्वी ही दुचाकी त्यांच्या घरासमोर उभी करून ठेवली. यावेळी तक्रारदाराच्या ओळखीच्या दोन मुलांनी दहा मिनिटाच्या कामासाठी दुचाकी घेऊन जाण्याचे सांगितले. मात्र त्यानंतर सोनगीर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक संजय जाधव यांनी या दोघा मुलांना अडवून तपासणी केली असता ही दोघेही मुले मध्याच्या बाटल्यांच्या बुचाची वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे जाधव यांनी ही दुचाकी पोलीस ठाण्यात जमा करून संबंधित मुलांना सोडून दिले. या संदर्भात तक्रारदारांनी वेळोवेळी सोनगीर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पोलीस नाईक संजय जाधव यांची भेट घेतली. यावेळी जाधव यांनी जमा केलेली अॅक्टिवा दुचाकी सोडून देण्यासाठी 75 हजार रुपये लाचेची मागणी केली. ही रक्कम न दिल्यास तक्रारदाराच्या भावा विरोधात गुन्हा दाखल होण्याची धमकी देखील दिली.

त्यामुळे तक्रारदाराने धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला संपर्क करून उपअधीक्षक अनिल बडगुजर यांना ही माहिती दिली. यानंतर या विभागाने तक्रारीची पडताळणी केली. पडताळणीत अंतिम तडजोडी अंती वीस हजार रुपये देण्याचे जाधव यांनी सांगितले. त्यानुसार पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण व प्रकाश झोडगे तसेच शरद काटके, कैलास जोहरे, राजन कदम आदींनी धुळे तालुक्यातील देवभाने येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेसमोर सापळा लावला. यावेळी संजय जाधव यांनी खाजगी पंटर ज्ञानेश्वर कोळी यांच्या माध्यमातून 20 हजार रुपये स्वीकारले. त्यामुळे सापळा लाऊन बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने या दोघांना ताब्यात घेतले. या दोघांच्या विरोधात सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

The post धुळे : वीस हजारांची लाच स्वीकारणाऱ्या पोलीस नाईकासह पंटरला अटक appeared first on पुढारी.