धुळे: शहिदांच्या परिवारासोबत आ. फारुख शाह यांनी साजरी केली भाऊबीज

धुळे; पुढारी वृत्तसेवा: दिवाळीतील भाऊबीज या सणाला अत्यंत महत्व आहे. यावर्षी शहीद जवानांच्या परिवारासोबत दिवाळी आणि भाऊबीज साजरी करण्याचा अभिनव उपक्रम आमदार फारुख शाह यांनी राबविला.भाऊबीज हा सण भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक मानला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावांचे औक्षण करुन त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. बहिणीकडून भावाला ओवाळले जाते. त्यानंतर भावाकडून बहिणीला भेटवस्तू दिली जाते. देशासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. अशा शहीद जवानांच्या परिवारासोबत दिवाळी आणि भाऊबीज साजरी करण्याचा निर्णय आ. फारुख शाह यांनी घेतला.

आ. शाह यांनी शहिदांच्या घरी प्रत्यक्ष भेट दिली. ऑपरेशन पराक्रम अंतर्गत कारगिलमधील लोअरमुंडा हायवेवर वीरमरण आलेले शहीद जयवंत वसंतराव सूर्यवंशी यांच्या पत्नी भारती जयवंत सूर्यवंशी यांच्या धुळ्यातील गार्डन आनंदनगर यांचे घरी, कोरोना महामारीत मृत्यू आलेले पो.कॉ. भूषण वाघ यांच्या पत्नी मनीषा भूषण वाघ यांच्या कल्याणीनगर येथील घरी, कोरोना महामारीत मृत्यू आलेले पो.कॉ. प्रकाश पुंडलिक मोरे यांच्या पत्नी शोभाबाई प्रकाश मोरे यांचे घरी, ऑपरेशन रक्षक अंतर्गत दक्षिण काश्मिरच्या निरपुरा गावात आतंकवादी चकमकीत वीरमरण आलेले महार रेजिमेंटचे शुर सैनिक मुंग्या नुरजी राऊत यांची पत्नी अरुणा मुंग्या राऊत यांच्या श्रमसाफल्य कॉलनी, तसेच न्याहलोद येथील सियाचीनमध्ये वीरमरण आलेले मनोहर रामचंद्र पाटील यांच्या पत्नी माया मनोहर पाटील यांच्या न्याहळोद येथील घरी जावून परिवारासोबत भाऊबीज साजरी केली.

यावेळी शहीद जवानांच्या पत्नींनी आमदार शाह यांचे औक्षण केले. त्यानंतर आ.शाह यांच्याकडून शहीद जवानाची आई आणि पत्नी यांना साडी, दिवाळीचा फराळ सस्नेह भेट म्हणून देण्यात आला. यावेळी सलीम शाह, एमआयएमचे जिल्हाध्यक्ष नासीर पठाण, शहराध्यक्ष नगरसेवक मुक्तार अन्सारी, नगरसेवक सईद बेग, नगरसेवक गनी डॉलर, नगरसेवक आमीर पठाण, माजी नगरसेवक साजिद साई, निसार अन्सारी, आसिफ पोपट शाह, कैसर अहमद, रफिक पठाण, हालिम शमसुद्दिन, नजर खान, रियाज शाह, साकिब शाह, शोएब बागवान आदी उपस्थित होते.

The post धुळे: शहिदांच्या परिवारासोबत आ. फारुख शाह यांनी साजरी केली भाऊबीज appeared first on पुढारी.