धुळे : शिंदखेड्यात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे सरकारवर टीकास्त्र

अंबादास दानवे

धुळे : पुढारी वृत्तसेवा

शेतकऱ्याला अडवण्याचे व रडवण्याचे काम हे गद्दार सरकार करत आहे. अशा सरकारला त्यांची जागा दाखवा, असे प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदखेडा येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आयोजित कार्यक्रमात केले.

परिसरातील शेतकऱ्यांच्या व्यथा व अडचणी जाणून घेण्यासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे शिरपूर व शिंदखेडा दौऱ्यावर आले होते. शिंदखेडा येथे आले असता त्यांनी शिवसैनिकांना मार्गदशन केले. महाराष्ट्रात 100 दिवसात 500 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असल्याचे उघड झाले आहे. काही आत्महत्या नापिकीमुळे तर काही ठिकाणी शेतीच्या मालाला भाव नसल्याने आत्महत्या झाल्या आहेत. “कोठे गेले त्यांचे आत्महत्या मुक्तीचे धोरण. केवळ शेतकऱ्यांना फसवण्याचेच काम सूरू आहे,” असा आरोप दानवे यांनी यावेळी केला.

ते पूढे म्हणाले, शिंदखेडा हा मतदार संघ धनदांडग्यांचा आहे. पण सर्वसाधारण माणूस पेटून उठला तर या धनदांडग्यांना हाणून पाडू शकतात, यात शंका नाही. आता ती वेळ आली आहे. शेतकऱ्यांचे रक्त शोषणाऱ्या या सरकारला त्यांची जागा दाखवा असे आवाहन त्यांनी केले. जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी घोषित केलेल्या नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतिबा फुले योजनेतून पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान प्रमाणपत्र शेतकऱ्यांना दानवे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. कार्यक्रमाअगोदर शिंदखेडा येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी सतीश पाटील यांच्या कुटुंबीयांची त्यांनी भेट घेवून त्यांचे कूटूंबियांचे सांत्वन केले. माजी तालुकाप्रमुख विश्वनाथ पाटील यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी सहसंपर्कप्रमुख हिलाल माळी, जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, माजी आमदार शरद पाटील, जिल्हासंघटक मंगेश पवार, उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, उपजिल्हाप्रमुख सर्जेराव पाटील, युवासेना युवाधिकारी आकाश कोळी, उपजिल्हा संघटक कल्याण बागल, आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा:

The post धुळे : शिंदखेड्यात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे सरकारवर टीकास्त्र appeared first on पुढारी.